Download App

Mumbai : फडणवीसांचे अधिकारी शिंदेंच्या गोटात, ब्रिजेश सिंह हे मुख्य सचिव तर प्रवीण परदेशी हे ‘मित्रा’चे अधिकारी

मुंबई :  महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्रा  या राज्य सरकारच्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी (Praveen Singh Paradesi) यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde )  यांनी केली आहे. तर आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह ( Brijesh Singh ) यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना परदेशी हे त्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. अत्यंत प्रभावी आणि कार्य कुशल सनदी अधिकारी अशी त्यांची ओळख राहिली. मे 2020 मध्ये मुंबई महापालिका आयुक्तपदावरून त्यांची बदली करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी ते केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झाले होते. त्यानंतर ते निवृत्त झाले. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सात महिन्यांपूर्वी आल्यानंतर परदेशी राज्य सरकारमध्ये पण नव्या भूमिकेत परततील, अशी अटकळ होती. मित्रा संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी घेतला. राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले निर्णय घेण्यासाठी मित्रा या संस्थेची स्थापना राज्य सरकारने नोव्हेंबर 2022 मध्ये केली होती.

ब्रिजेश सिंह हे फडणवीस सरकारच्या काळात माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव व महासंचालक होते. आता ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयात सचिव म्हणून आले आहेत. भूषण गगराणी हे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव तर विकास खारगे हे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आहेत. त्यांच्या सोबतीला मुख्यमंत्र्यांच्या टीममध्ये ब्रिजेश सिंह आले आहेत. ब्रिजेश सिंह हे सध्या अतिरिक्त महासंचालक (गृहरक्षक दल) या पदावर कार्यरत आहेत.

Tags

follow us