Abhishek Ghosalkar Murder Case : शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना चांगलीच चपराक लगावत घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवला. अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) स्वीकारली. यावर सुनावणी करतांना न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे (Revati Mohite-Dere) आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने हे हत्या प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय दिला होता. तपास हाती येताच सीबीआय अॅक्शन मोडमध्ये आहे. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचा तपास CBI कडे वर्ग, मुंबई उच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक
अभिषेक यांच्या हत्येच्या कटातील सूत्रधारांची पोलिसांकडून पाठराखण केली जात आहे. योग्य तपास करण्यात पोलीस यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. त्यामुळे या प्रकऱणाचा तपास सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवण्याचे निर्देश द्या, अशी याचिका अभिषेक यांच्या पत्नी माजी नगरसेवक तेजस्वीनी घोसाळकर यांनी दाखल केली होती. या याचिकेवर पंधरा दिवसांपूर्वी निकाल देण्यात आला होता. घोसाळकर हत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना चांगलेच फटकारले. मुंबई पोलिसांनी तपासात (Mumbai Police) दाखवलेल्या त्रुटी दखलपात्र असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले.
अभिषेक यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मुख्य आरोपींचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी गांभीर्याने तपास केला नाही. त्यामुळे खरे सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. असं असतांना पोलिसांनी घाईघाईत आरोपपत्र दाखल केले, अशा शब्दांत न्यायालयाने पोलिसांना फटकारले. यावेळी अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका किराणा दुकानदाराच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरिवली पश्चिम एमएचबी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास आयपीएस अधिकारी उपमहानिरीक्षक सायली धुरत करणार आहेत. तपास सीबीआयने हाती घेतल्याने कार्यवाहीत अधिक वेग येईल असे सांगण्यात येत आहे. या तपासातून तरी खऱ्या सूत्रधारांचा शोध होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Mumbai Police : अभिषेक घोसाळकर हत्येनंतर पोलीस अलर्ट; शस्त्र परवान्यांची होणार तपासणी