Download App

Video : असुरांचा संहार कराया मशाल हाती दे; अराजकीय गाण्यासह ठाकरे विधानसभेच्या मैदानात

Uddhav Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण (Maharashtra Elections) तापू लागलं आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) या निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक थीम साँँग लाँच करण्यात आले. या गीताच्या माध्यमातून निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशाही करण्यात आला. याप्रसंगी ठाकरे गटातील नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबतही भाष्य केलं.

मशाल हाती दे असे या गीताचे बोल आहेत. हे गाणे ऑडिओ स्वरुपात आहे. प्रसिद्ध गायक नंदेश यांनी मशाल हाती दे हे गीत गायलं आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या गाण्याचं अनावरण करण्यात आलं. हे गाणं लोकांपर्यंत पोहोचवण्यात यावं अशा सूचना त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिल्या. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

आजपासून नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आपण दसरा मेळाव्यात भेटणार आहोतच. महिषासूर मर्दिनी, असुरांचा वध करून जे असूर माजले होते, त्यांचा वध करणाऱ्या मातेचा आजचा दिवस आहे. त्यामुळे आजची पत्रकार परिषद ही राजकीय नाही. आज राज्यात जे अराजक माजलं आहे त्यावर एक गाणं आलं आहे. आज राज्यात तोतयागिरी आहे. या तोतयागिरीचा नायनाट करण्यासाठी आपण गाण तयार केलं आहे. देवी आणि जनतेच्या चरणी सादर करत आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मागील दोन अडीच वर्षांपासून आम्ही न्याय मंदिराची दारं ठोठावत आहोत. न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे पण न्याय मिळत नाही. म्हणूनच जगदंबेला साकडं घातलंय की निदान तू तरी दार उघड. मला खात्री आहे की जगदंबेला हाक मारली की ती धावून येतेच. आज राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. कुणीच त्राता नाही. म्हणूनच आम्ही आता आई जगदंबेलाच साकडं घातलं आहे असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. दरम्यान, आता विजयादशमीला शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आता या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 उद्धव ठाकरे जितके भोळे तितकेच लबाड, त्यांनी मला मुद्दाम.., शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

follow us