Download App

ठाकरे बंधुंच्या युतीची चाहूल, शिंदेंचा आधीच मास्टरस्ट्रोक; मनसेचा ‘हा’ नेता हाती घेणार धनुष्यबाण

आज दुपारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनसेचे पवईतील माजी नगरसेवक अविनाश सावंत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

Mumbai Politics Eknath Shinde vs Raj Thackeray :  मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. मुंबईची निवडणूक म्हणजे एखाद्या राज्याचीच निवडणूक अशी स्थिती आहे. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईची सत्ता (Mumbai Politics) काबीज करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत. दोघांकडूनही तसे संकेत मिळत आहेत.

दोन्ही पक्ष एकत्र आले तर याचा सर्वात मोठा फटका शिंदे गटाला बसू शकतो असे सांगितले जात आहे. परंतु, हा फटका बसण्याआधीच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना धक्का देण्याची तयारी केली आहे. आज दुपारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनसेचे पवईतील माजी नगरसेवक अविनाश सावंत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी अंधेरीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

“मी आताही राजला फोन करू शकतो अन्..”, युतीच्या थेट प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं थेट उत्तर

मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील हिंदी भाषिकांना मारहाणीच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मीरा भायंदर येथील एका व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी मराठी भाषेचा अपमान केला म्हणून मारहाण केली होती. यानंतर हिंदी भाषिक व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे बंधुंनीही प्रतिमोर्चा काढला होता.

हिंदी भाषा सक्तीचे शासन निर्णय मागे घेतले गेल्यानंतर ठाकरे बंधुंनी विजयी मोर्चा काढला होता. या सगळ्या घडामोडींतून ठाकरे गट आणि मनसेची युती होण्याचे संकेत मिळाले आहेत. जर ही युती झाली तर याचा फटका एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बसू शकतो असे गणित मांडले जात आहे. यात काही प्रमाणात तथ्यही आहे. त्यामुळे ही युती होण्याआधीच शिंदेंनी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे.

मनसेतील माजी नगरसेवकांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना पहिलं यश मिळालं आहे. माजी नगरसेवक अविनाश सावंत आजच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाची जय्यत तयारी करण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आता एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रस्त्यावरची लढाई कोर्टात! हिंदी भाषिकांना मारहाणप्रकरणी ठाकरेंविरुद्ध ‘सुप्रीम’मध्ये याचिका

follow us