“मी आताही राजला फोन करू शकतो अन्..”, युतीच्या थेट प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं थेट उत्तर
मनसेशी युतीबाबत अद्याप चर्चा का झालेली नाही? या प्रश्नाचं उत्तर सूचक शब्दांत त्यांनी या मुलाखतीत दिलं आहे.

Uddhav Thackeray Interview : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray Interview) मुलाखत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी काही खळबळजनक खुलासे केले आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींवर परखड भाष्य केलं आहे. तसेच मनसेशी युतीबाबत अद्याप चर्चा का झालेली नाही? या प्रश्नाचं उत्तर थेट शब्दांत त्यांनी या मुलाखतीत दिलं आहे. मी राजशी थेट चर्चा केली तर अडचण कुणाला? मी आता फोन करू शकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी राजकीयदृष्ट्या एकत्र यावं अशी लोकांची मागणी आहे असे संजय राऊत यांनी विचारले त्यावर 20 वर्षांनी आम्ही एकत्र आलो. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असं काही नाही. पण मी जे म्हटलं मराठी भाषेसाठी, मराठी धर्मासाठी, मराठी अस्मितेसाठी जे जे करण्याची गरज आहे ते ते करण्याची माझी तयारी आहे. यासंदर्भात माझी राज ठाकरेंशी चर्चा होईल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांचं सरकार कशामुळं कोसळलं; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा
5 जुलै रोजी निघालेल्या मोर्चात राज ठाकरे म्हणाले होते की बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते आज साकार होत आहे. तुम्ही म्हणाला होतात की जे लोकांच्या मनात आहे ते आम्ही करू. याचा काय अर्थ घ्यायचा? या प्रश्नाचं उत्तर देताना आता याचा अर्थ कसा घ्यायचा? त्यांच्या मनात जे आहे ते आम्ही साकारू हाच त्याचा अर्थ होतो. मराठीच्या मुद्द्यावर मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे नाहीतर मग कुणासाठी लढतोय असं होईल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मी आताही राजला फोन करू शकतो
युतीसाठी थेट बोलणार का? अस थेट प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. यावर उद्धव ठाकरेंनीही थेट उत्तर दिलं. मी राजशी थेट चर्चा केली तर अडचण कुणाला? मी आता फोन करू शकतो. तो मला करू शकतो. आम्ही आता भेटू शकतो. अडचण काय? बाकीचे लोक चोरुन भेटतात पण आम्ही चोरूनमारून भेटणारे नाही. ठाकरे ब्रँड आहे. चोरूनमारून करत नाही. भेटायचं तर उघड भेटू. काय अडचण कुणाला? आणि आम्हाला तरी?
देशासाठी आम्ही हिंदू एकच
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र विरुद्ध इतर राज्य असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पण इतर राज्य पेटत नाही. आम्ही आमची भाषा लादत नाही. तुम्ही आमच्यावर कोणतीही भाषा लादू नका. आम्ही त्या त्या भाषेचा मान राखतो. पण जेव्हा देशाचा विचार करतो तेव्हा आम्ही हिंदू म्हणून एक असतो.
विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपताच दानवे मवाळ?, दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबद्दल काय म्हणाले?