मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा नवीन वर्षातील तिसरा महाराष्ट्र दौरा ठरला आहे. येत्या 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी मुंबई, पुणे आणि साताऱ्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते मुंबईतील कोस्टल रोड (Mumbai Costal Road), पुण्यातील विमानतळाचे नवीन टर्मिनलचे आणि मेट्रोच्या विस्तारित मार्गिकेचे उद्घाटन पार पडणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसहिंता लागू होण्याची शक्यता असल्याने आचारसंहितेपूर्वीचा त्यांचा हा अखेरचा महाराष्ट्र दौरा ठरण्याचे चित्र आहे. (Prime Minister Narendra Modi will visit Mumbai, Pune and Satara on February 19.)
नवीन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा महाराष्ट्रात येत आहेत. यापूर्वी 12 जानेवारी रोजी रोजी पंतप्रधान मोदी नाशिक आणि मुंबईच्या दौऱ्यावर होते. नाशिकमध्ये 27 व्या राष्ट्रीय युवक महोत्सवाला उपस्थित राहिल्यानंतर ते अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुंबईत आले होते. त्यानंतर ते सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. इथे त्यांच्या हस्ते 15 हजार घरकुलांचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर आता ते आता पुन्हा एकदा मुंबई, पुणे आणि साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
मुंबई कोस्टल रोड प्रकल्प दक्षिण आणि उत्तर अशा दोन भागात विभागला गेला आहे. यात मुंबई ते कांदिवली या सुमारे 29 किमीच्या भागाचे काम प्रथम हाती घेण्यात आले होते. तर मरीन ड्राईव्ह ते वरळी-वांद्रे सी लिंक हा साडेदहा किलोमीटरचा पट्टा दुसऱ्या टप्प्यात येतो. 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यातील मरीन ड्राइव्ह ते वरळी या साडे दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्घाटन होणार आहे. तर पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय रुबी हॉल ते रामवाडी या मेट्रोच्या विस्तारित मार्गिकेचेही उद्घाटनही त्यांच्या हस्ते पार पडणार आहे.
त्यानंतर पंतप्रधान मोदी सातारा येथील शिवसन्मान पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार आहेत. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या वतीने यंवर्षीपासून शिवसन्मान पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. हा पहिला शिवसन्मान पुरस्कार यावर्षी नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. येत्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारीला सातारा येथे भव्य दिव्य सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे.