मुंबई : पाणी आणि दुष्काळाचा प्रश्न हा केवळ पर्यावरणापुरता मर्यादित नसून तो समाजाच्या वर्तमानाशी आणि भविष्याशी जोडलेला महत्त्वाचा विषय आहे. या प्रश्नाचे गांभीर्य कलांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने ‘पु. ल. कला महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये हा बहुविध सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.४५ वाजता रविंद्र नाट्यमंदिर येथे होणार असून, सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ पार पडणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, गुरुवार ५ नोव्हेंबर रोजी उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री ८ ते १० या वेळेत ‘ती दोघं’ या विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई यांच्या जीवनावर आधारित तसेच रत्नाकर मतकरी लिखित दोन अंकी नाट्यकोट्यांचा हा विशेष आविष्कार आहे. याचे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले असून, विद्याधर जोशी, विजय केंकरे, सुप्रिया विनोद, सौरभ करंदीकर, हर्षदा बोरकर, आदित्य कदम, योगेश उत्तेकर आणि दीप्ती दांडेकर हे कलाकार अभिवाचनात सहभागी होणार आहेत.
शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत दिव्यांग कलाकारांचा ‘नमो भारत! वंदे मातरम्’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. कांचन सोनटक्के यांची निर्मिती संकल्पना असून, भारत मोरे यांनी या प्रयोगाचे दिग्दर्शन केले आहे. रोटरी संस्कारधाम अंधकेंद्राचे २७ दिव्यांग कलाकार या प्रयोगात सहभागी होणार आहेत. त्याच दिवशी रात्री ८ ते १० या वेळेत ‘हसता-हसवता’ या काव्य, शब्द आणि नाट्याची हासरी मैफल रंगणार आहे. या कार्यक्रमात वैभव मांगले, भार्गवी चिरमुले, अधोक्षज क-हाडे, श्रीरंग भावे आणि दीपाली देसाई सहभागी होणार असून, मुकेश माचकर यांनी या कार्यक्रमाची संहिता लिहिली आहे.
शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत कलांगण येथे ‘उजळती जग मंगलमय’ ही पहाटेच्या रागांवर आधारित गाजलेल्या नाट्यपदांची सुरेल मैफल सादर होणार आहे. या कार्यक्रमाची संहिता व मार्गदर्शन पं. मुकुंद मराठे यांचे असून, दीपाली केळकर संवादिका म्हणून सहभागी होणार आहेत. संपदा माने, प्राजक्ता मराठे, धवल भागवत, धनंजय पुराणिक आणि केदार भागवत हे कलाकार या मैफलीत सहभागी होतील.
शनिवारी सायंकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत रविंद्र नाट्यमंदिर येथे पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकावर आधारित ‘पुलंची पिल्ले’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या प्रयोगाची संकल्पना व नाट्यरूपांतर विजय लाड यांचे असून, हर्षद पाचाळ यांनी दिग्दर्शन केले आहे. विराज वेव्हाणकर, ऋग्वेद परांजपे, अयांश कांदळगांवकर, प्रज्वल चव्हाण, नहुष वैद्य, अर्जुन माने, दर्श विशे, आर्यन लोहारकर आणि विराट कुंटे हे कलाकार या नाटकात भूमिका साकारणार आहेत.
शनिवारी रात्री ८ ते १० या वेळेत रविंद्र नाट्यमंदिर येथे मराठी लावणीच्या क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत मधु कांबीकर आणि शकुंतला नगरकर यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करणारा विशेष लावणी कलाविष्कार सादर होणार आहे. लावणीच्या नभांगणातील या दोन लखलखत्या तारकांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमाचे लेखन व दिग्दर्शन भूषण कोरगावकर आणि कुणाल विजयकर यांनी केले आहे. पुष्पा सातरकर, गौरी जाधव, गीता वाईकर, मीराबाई पुणेकर, लताबाई वाईकर, रुचिता जाधव, प्रिया टवके आणि अक्षय मालवणकर हे लावणी कलाकार आपल्या सादरीकरणातून या दोन्ही ज्येष्ठ कलावंतांना अभिवादन करणार आहेत.
रविवार, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत कलांगण येथे ‘नादमधुर पहाट’ हा विशेष संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दहा तबल्यांमधून विविध वाद्यांचे आवाज, तसेच ढोल, बासरी, हॅण्डोलिन, साईड रिम आणि की-बोर्ड यांच्या सुरेल साथीने ही बहारदार वाद्य मैफल रंगणार आहे. पं. शरदकुमार दांडे व सहकारी या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. त्यांच्यासोबत प्रबोध जोशी (हॅण्डोलिन), निरंजन भालेेराव (बासरी), ऋग्वेद कुलकर्णी (की-बोर्ड) आणि श्री. महेश साठे (साईड रिम) हे कलाकार आपल्या वादनातून या पहाटेच्या मैफलीत रंगत आणणार आहेत.
रविवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत रविंद्र नाट्यमंदिर येथे पु. ल. देशपांडे लिखित आणि संगीतबद्ध ‘या इथे चाळ बटाट्याची’ या विनोदी संगीत नाटकाचा विशेष प्रयोग सादर होणार आहे. योगेश सप्रे यांनी नाट्यरूपांतर केले असून, देवेंद्र भोमे यांनी संगीत दिग्दर्शन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. पंढरीनाथ कांबळे, अजित परब, मिलिंद जोशी, आशुतोष मुंगळे, अंजली मराठे, शर्मिका भिडे, स्वरांगी मराठे, केतन पवार, वज्रांग आफळे, मधुरा आफळे, तन्वी परांजपे, इशिता सावळे आणि साक्षी देशपांडे हे कलाकार या नाटकात सहभागी होणार आहेत.
नाट्य, संगीत आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांसोबतच महोत्सवात चित्रकला आणि शिल्पकलेलाही विशेष स्थान देण्यात आले आहे. २ ते ९ नोव्हेंबरदरम्यान चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, अॅक्रिलिक रंगांतील चित्रकलेचा आविष्कार चित्रकार एम. आर. पिंपरे यांच्या कलाकृतींमधून अनुभवता येणार आहे. तसेच २ ते ९ नोव्हेंबरदरम्यान दुपारी १२ ते सायंकाळी ७ या वेळेत कलांगण येथे शिल्पकला कार्यशाळा, प्रात्यक्षिके आणि इन्स्टॉलेशन्सचे आयोजन करण्यात आले आहे.
‘उत्सव कलांचा, उत्सव कलाकारांचा…’ या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या महोत्सवात पाणी आणि दुष्काळ या विषयाला केंद्रस्थानी ठेवून विविध कलाप्रकारांद्वारे सामाजिक जाणीव जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नाट्य, संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला आणि लावणी अशा विविध कलाविष्कारांच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच सामाजिक प्रश्नांवर विचार करण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
या महोत्सवाविषयी माहिती देताना पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालिका मिनल जोगळेकर म्हणाल्या,“मुंबईतील कला रसिकांसाठी हा महोत्सव विविध कलाप्रकारांचा समृद्ध आणि आनंददायी अनुभव देणारा ठरणार आहे.महोत्सवातील प्रत्येक कार्यक्रमामागे वेगवेगळ्या कलाप्रकारांना आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. रसिकांनी या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे.”
सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. डॉ. किरण कुलकर्णी हे सांस्कृतिक कार्य विभाग आणि मराठी भाषा विभागाचे सचिव असून, मिनल जोगळेकर या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालिका आहेत. डॉ. दीपक करंजीकर हे अकादमीच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे, महोत्सवातील सर्व कार्यक्रमांना रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील नाट्य, संगीत, साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह सर्व कला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
