मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात Maharashtra State Road Development Board च्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन अखेर राधेश्याम मोपलवार (Radheshyam Mopalwar) यांना हटविण्यात आले आहे. त्यांच्याजागी आता अनिल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या सेवा काळात मोपलवार अनेकदा वादात सापडले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते. मात्र क्लिनचीट मिळाल्याने ते एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कायम होते. अखेर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी मोपलवार यांना पदावरुन हटवले आहे. (Radheshyam Mopalwar has finally been removed from the post of Managing Director of Maharashtra State Road Development Board.)
अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे या सर्वांच्याच काळात कायम जवळचे स्थान मिळविणारे अधिकारी म्हणून मोपलवार यांना ओळखले जात होते. 2014 मध्ये फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर सनदी अधिकारी असलेल्या मोपलवार यांची एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पुढे 2018 मध्ये शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना रेकॉर्डब्रेक आठवेळा मुदतवाढ मिळाली होती.
या दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयातील पायाभूत सुविधा प्रकल्प वार रुमच्या महासंचालकपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांचा सुमारे 55 कोटींचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या उभारणीत मोपलवार यांची प्रमुख भूमिका राहिली. याशिवाय 11 हजार कोटी रुपये खर्चाचा वर्सोवा-वांद्रे सी लिंक, पुणे-मुंबई एक्स्प्रेसचे अद्यावतीकरण, ठाणे खाडी पुलाचे बांधकाम हे प्रकल्पदेखील त्यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले आहेत. आता राज्य सरकारच्या सर्वात महत्वाच्या महामंडळाची जबाबदारी अनिल गायकवाड यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
ऑगस्ट 2017 मध्ये मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पात एका दलालासोबत मोबाईल फोनवरून सौदेबाजी केल्याचा आरोप मोपलवार यांच्यावर झाला होता. त्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांनी विरोधकांच्या मागणीनंतर मोपलवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवत त्यांच्याविरोधात चौकशी समितीची घोषणा केली होती. डिसेंबर 2017 मध्ये, मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर त्यांची पुन्हा एकदा एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.