मुंबई : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई केली जात असून, सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडीचे पथक वायकर यांच्या घरी दाखल झालं आहे. वायकर यांच्या घरासह त्यांच्या भागिदारांच्या घरी आणि कार्यालयांवर देखील छापेमारी केली जात आहे. याच भूखंड प्रकरणात सप्टेंबरमध्ये ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर 21 डिसेंबर रोजी वायकर यांची साधारण सात ते आठ तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज (दि. 9) त्यांच्या घरावर धाड टाकण्यात आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून रवींद्र वायकर आणि कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, काही कागदपत्र मिळतात का? याची चाचपणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. ( ED Raids Uddhav Thackeray Party MLA Properties In Mumbai Over Money Laundering Case)
Radhakrishna Vikhe : ..तर बदनामीचा गुन्हा दाखल करावाच लागेल; ‘त्या’ आरोपांवर विखे पाटील संतापले
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील जोगेश्वरी येथील भूखंड आणि हॉटेलच्या बांधकामप्रकरणात वायकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार वायकर यांनी जोगेश्वरी येथी सुप्रीमो क्लबचा गैरवापर तसेच येथे हॉटेल बांधताना माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे आरोप केले होते. इतकेच नाही तर हॉटेलचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेने हालचाली करत बांधकामाला स्थगिती दिली होती. या घडामोडींनंतर आमदार वायकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र न्यायालयाकडून त्यांना कोणताच दिलासा मिळाला नाही.
India Maldives Tension : मालदीवमध्ये राजकीय भूकंप? विरोधकांच्या ‘अविश्वासा’च्या हालचाली
वायकरांवर आरोप काय?
वायकर यांच्यावर मुंबई पालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप आहे. याशिवाय मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने शेकोडो कोटींच्या घोटाळ्याचाही आरोप वायकरांवर करण्यात आला आहे. तसेच पालिकेच्या अख्यत्यारीत असलेले क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम केल्याचे वायकरांवर आरोप असून, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील व्याखली गावात हे बांधकाम करण्यात आले आहे. तर हॉटेलची किंमत 500 कोटी असल्याचा भाजप नेत्यांनी दावा केला आहे.
उद्धव ठाकरेंची थोड्यावेळात पत्रकार परिषद
दुसरीकडे, उद्या आमदार अपात्र प्रकरणावर राहुल नार्वेकर हे निकाल देणार आहे. या निकालाच्या एक दिवस आधी अशाप्रकारे ईडीने धाड टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर, दुपारी साडेबाराच्या सुमारास उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात ते या कारवाईवर काही भाष्य करतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ईडी काय राज्य सरकारच्या ताब्यात आहे का?
आमदार अपात्र प्रकरणावर उद्या (दि.10) निकाल लागणार आहे. त्याच्या एकदिवस आधी ठाकरे गटाचे आमदार वायकर यांच्यावर धाड टाकल्याने राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. वायकरांवरील ही कारवाई सुड भावनेने करण्यात आली असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. तर, ईडी काय राज्य सरकरारच्या ताब्यात आहे का? असा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. ज्यांना कर नाही त्यांना डर कशाला असला पाहिजे? असा प्रश्नही शिंदेंनी प्रतिक्रिया देताना उपस्थित केला आहे. कोणत्याही प्रकारच्या सूड भावनेनं राजकीय आकस ठेवून आमचं सरकार काम करणार नसल्याचेही शिंदे यावेळी म्हणाले.
पत्रकारांशी संवाद..
🗓️ 09-01-2024📍मुंबई https://t.co/8Iy5OPnXlV
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 9, 2024