Sameer Wankhede :अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर चर्चेत आलेले एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने 22 मे पर्यंत कोणतीही कठोर कारवाई आणि अटक करण्यास स्थगिती दिली आहे. वास्तविक, सीबीआयने वानखेडे यांना 18 मे रोजी म्हणजेच गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते. अटकेच्या भीतीने त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स मिळाल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. येथे सीबीआयने हायकोर्टात सांगितले होते की, आम्ही त्यांना अटक करत नाही, जर त्यांना हजर व्हायचे नसेल तर ते आम्हाला सांगू शकले असते.
सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. वानखेडे यांच्या याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली असून त्यांना 22 मे पर्यंत दिलासा देण्यात आला आहे. आता 22 मे पर्यंत अटकेवर बंदी घातल्यानंतर आता समीर वानखेडे हे शनिवारी सकाळी 11 वाजता मुंबईतील बीकेसी येथील सीबीआय कार्यालयात जाणार असून तेथे ते सीबीआयच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत.
आर्यन खानला अटक केल्यानंतर चर्चेत
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि इतरांवर आर्यन खान प्रकरणात शाहरुख खानकडून 25 कोटी रुपये उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर 2021 रोजी कॉर्डेलिया क्रूझवर रेव्ह पार्टीदरम्यान छापा टाकला आणि आर्यन खानला तेथे अटक केली. आर्यन खान 26 दिवस मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये बंद होता. नंतर आर्यनला जामीन मिळाला.
एकत्र बसून मोठा नेता कोण ते ठरवा; रोहित पवारांनी विखे-शिंदेंना खिजवले !
एफआयआरनुसार, या प्रकरणातील साक्षीदार केपी गोसावी हा आर्यन खानचे वडील शाहरुख खान यांच्याकडून 25 कोटी रुपये उकळण्याची योजना आखत होता. तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या वतीने शाहरुख खानकडून कोट्यवधी रुपये वसूल करण्याचा प्रयत्न गोसावी करत होता. एफआयआरनुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या विशेष तपास पथकाने केलेल्या तपासात आर्यन खानसह आरोपींना स्वतंत्र गवाह केपी गोसावी यांच्याकडून खासगी वाहनातून एनसीबी कार्यालयात आणण्यात आल्याचे समोर आले आहे.