महापौर पद, कॉलर टाईट अन् भाजपमध्येच मतभेद? किरीट सोमय्यांनी मंत्री लोढांना फटकारलं
Kirit Somaiya On Mangal Prabhat Lodha : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकांमध्ये
Kirit Somaiya On Mangal Prabhat Lodha : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष जोरदार प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोग पुढील काही दिवसात राज्यातील 29 महानगर पालिकांसाठी निवडणूक जाहीर करणार असल्याने मुंबई महानगपालिकेत यंदा कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मुंबईत महायुतीचा महापौर होणार असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर पुन्हा शिवसेना ठाकरे गटाचा महापौर होणार असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. तर राज्याचे मंत्री आणि भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईत भाजपचा महापौर होणार असा दावा एका कार्यक्रमात बोलताना केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरुन भाजपमध्येच मतभेद असल्याचे दिसून येत आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी केलेल्या दाव्यावरुन माजी खासदार किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी त्यांना फटकारलं आहे. माध्यमांशी बोलताना माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले की, महापौरसाठी भाजप लढत नाहीये. जे नेते महापौर पद म्हणत आहे त्यांना मी सांगितलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सांगितलं आहे की, त्यांना आवरा. कसली कॉलर टाईट? कसलं महापौर पद? आमच्या डोळ्यासमोर मुंबई (BMC Election) आहे असं माध्यमांशी बोलताना माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले.
कोविडच्या काळात ठाकरे सेना कमाई करत होती
तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. किरीट सोमय्या म्हणाले की, कोविडच्या काळात ठाकरे सेना कमाई करत होती. खिचडी, रेमडेसिवर घोटाळा झाला. आम्हाला महापालिका भ्रष्टाचारापासून मुक्त करायची आहे. मुंबईचा विकास करणे हे आमचे लक्ष आहे. त्यामुळे महापौर पद आणि कॉलर टाईटचा प्रश्नच नाही. देवेंद्र फडणवीस असो किंवा नरेंद्र मोदी, मुंबईत जे पंचवीस वर्षात ठाकरे सेनेने लुटली आहे त्या मुंबईचा विकास आम्ही करणार आहोत असं किरीट सोमय्या म्हणाले.
Video : कधीकधी गोष्टी आपल्या मनाप्रमाणे.., लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पहिल्यांदाच सोडलं मौन
नेमकं काय म्हणाले होते मंत्री मंगलप्रभात लोढा?
एका कार्यक्रमात बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, मुंबई महानगर पालिकेत जेव्हा भाजपचा महापौर बनेल, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याच्या शपथविधीसाठी महापालिकेत जातील, त्यावेळी तुमची आणि माझी कॉलर टाईट होईल. भाजप हा पक्ष देवाभाऊंचा आहे. राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर चालतात असं मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले होते.
