Download App

पहिले राऊत मग सुळे अन् आता कोल्हे; विरोधकांकडून फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव सुरूच…

आम्ही विरोधी पक्षात असलो तरी महाराष्ट्र राज्य आमचे आहे असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत फडणवीसांचे कौतुक करताना म्हणाले होते.

  • Written By: Last Updated:

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गेल्या दोन दिवासंपासून विरोधक असणाऱ्या विविध राजकीय नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. हा कौतुकाचा सोहळा काही केल्या थांबताना दिसत नसून, पहिले राऊत, मग सुप्रिया सुळे आणि आता खासदार अमोल कोल्हेंनी एक्सवर फडणवीसांचा व्हिडिओ पोस्ट करत त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. (Opposition Leaders Makes Continues Shower On CM Fadnavis)

हो आम्ही फडणवीसांचे कौतुक केले – राऊत

काल (दि.3) रोजी ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) अभिनंदन करण्यात आले होते. एवढेच काय तर इतरवेळी विरोधाची राळ उठवणाऱ्या संजय राऊतांनीही (Sanjay Raut) जाहीरपण फडणवीसांचे कौतुक केले होते. ज्यात राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. कौतुक, का? तर, सरकारने चांगले काम केले आहे. आम्ही विरोधी पक्षात असलो तरी महाराष्ट्र राज्य आमचे आहे असे म्हटले होते.

एकटेच फडणवीस मिशन मोडवर – सुळे 

राऊतांच्या आणि सामनातील संपादकीयमधील कौतुकाची चर्चा थोडी थांबत नाही तोच खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील सध्याच्या सरकारमध्ये फक्त मुख्यमंत्री एकमेव अॅक्टिव आहे आणि ती म्हणजे देवेंद्र फडणवीस असे म्हणत कौतुक केले होते. त्यानंतर आता शरद पवार गटाचे खासदार अमोक कोल्हेंनी फडणवीसांच्या आळंदी येथील कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्या कृतीचे कौतुक केले आहे.

आळंदीतील कार्यक्रमात फडणवीसांनी नेमकं काय केलं?

आळंदीत काल (दि.4) संत कृतज्ञता कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी फडणवीसांचा जिरेटोप भेट म्हणून देण्यात आला. मात्र, हा जिरेटोप फडणवीसांनी घालण्यास नम्रपणे नकार देत त्याला आदरपूर्वक नमस्कार करत तो परत दिला. फडणवीसांच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यांच्या या विनम्रकृतीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

फडणवीसांच्या कृती मनाला भावणारी – कोल्हे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात भेट म्हणून देण्यात आलेला जिरेटोप घालण्यास नम्रपणे नकार दिला, जिरेटोपास श्रध्देने वंदन करून योग्य सन्मान केला ही कृती अतिशय स्तुत्य व स्वागतार्ह आहे. राजकीय मतभेद असले, तरी शिवशंभू विचारांचा पाईक म्हणून ही कृती मनाला भावणारी असल्याचे कोल्हेंनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

follow us