मुंबई : येथील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गरवारे क्लब हाऊस निवडणुकीत (Garware club House election) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र त्यांच्या डेव्हलपमेंट पॅनेलला पराभवाचा धक्का बसला आहे. भाजप नेते मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पॅनेलने या निवडणुकीत बाजी मारली. मुंबई क्रिकेट संघटना व गरवारे क्लबमधील निवडणुकीत मागील पवार यांचे अनेक वर्षांपासून असलेले वर्चस्व पाहता हा पराभव त्यांना मोठा धक्का मानला जात आहे. (Sharad Pawar’s Development Panel Defeated in Garware Club House Elections)
गरवारे क्लब हाऊसची निवडणूक मंगळवारी (26 सप्टेंबर) पार पडली. यावेळी पवार हे अध्यक्षपदासाठी उभे होते तर इतर 12 पदांसाठी त्यांचे डेव्हलपमेंट पॅनेल रिंगणात होते. अध्यक्षपदासाठी पवारांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर उपाध्यक्ष, खजिनदार आणि दहा व्यवस्थापकीय समिती सदस्य अशा 12 पदांसाठी मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांनी जीसीएच डायनॅमिक पॅनेल उभे करत या निवडणुकीत चुरस निर्माण केली होती. या निवडणुकीत क्लबच्या 13 हजार सदस्यांनी प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन माध्यमातून मतदान केले.
यात पवार यांच्या डेव्हलपमेंट पॅनेलचे उपाध्यपदाचे उमेदवार राज पुरोहित यांच्याह सर्वांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. जीसीएच डायनॅमिक पॅनेलने वर्चस्व प्रस्थापित केल्याने उपाध्यक्षपदासाठीच्या लढतीत सायरस गोरिमार यांनी राज पुरोहितांचा 1, 432 मतांनी पराभव केला. त्यांना 2,452 मते मिळाली. तर राज पुरोहित यांना 1,020 मते मिळाली. खजिनदारपदासाठी झालेल्या लढतीत मनीष अजमेरा यांनी दिलीप शाह यांचा पराभव केला. मनीष अजमेरा यांना 2, 484मते मिळाली. तर दिलीप शाह यांना 1251 मते मिळाली.
गरवारे क्लबची नवी कार्यकारिणी अध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष सायरस गोरिमार, खजिनदार मनीष अजमेरा, व्यवस्थापकीय समिती सदस्य मोहित चतुर्वेदी, रोहित शाह, मनीष शाह, जनक गांधी, अमित शाह, कमलेश मोदी, चेतन बाविशी, कमलेश संघवी, नरेंद्र शाह, अनुज भार्गव, पायल शाह (महिला सदस्य)