मुंबई : “मला देशाचा नेता वगैरे व्हायचं नाही. मी इकडे आहे तो बरा आहे. पण मला देशाच्या नागरिकांना नक्की जागे करायचे आहे”, असे म्हणतं आपण पंतप्रधानपदाचा दावेदार नसल्याचे शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केले. ते मुंबईत शिवसेना (UBT) च्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर आणि राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. (Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray clarified that he is not a contender for the post of Prime Minister)
उद्धव ठाकरे म्हणाले, मला परवा पत्रकार परिषदेत पंतप्रधानपदाबद्दल प्रश्न विचारला. मी त्यावर सांगितलं आमच्याकडे खूप चेहरे आहेत. तुम्ही सांगा तुम्हाला कोणता पाहिजे. महिला पाहिजे तर महिला आहेत. शिक्षणाप्रमाणे आहेत, वयोमानाप्रमाणे आहेत. पण तुमच्याकडे तर फक्त एकच चेहरा आहे आणि तो सुद्धा आता कमी पडायला लागला आहे, म्हणून त्या फोटोच्या बाजूला आपल्या साहेबांचा जे एकमेव हिंदु हृदयसम्राट आहेत, त्यांचा फोटो लावाला लागत आहे, असे म्हणत ठाकरे यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
मागील अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे अशी शिवसेना (UBT) मधून मागणी होत आहे. खासदार संजय राऊत यांनी अनेकदा याबाबत जाहीर मागणी केली आहे, तसंच ते पंतप्रधान होतील असे दावे केले आहेत. त्याशिवाय खासदार प्रियांका चुतर्वेदींनीउद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचे म्हटले आहे. इंडियाच्या पत्रकार परिषदेतही ठाकरे यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्यांनी त्यावर मिश्किल उत्तर देत या प्रश्नावर फारसे बोलणे टाळले होते. मात्र आता आजच्या पदाधिकारी मेळाव्याच्या बैठकीच्या निमित्ताने ठाकरे यांनी आपण पंतप्रधानपदाचे दावेदार नसल्याचे सुचित केले आहे.
इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? यासाठी राजकीय पक्षांमध्ये आपापल्या नेत्यांची नावे पुढे करण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे दिसून येत आहे. कालपर्यंत पंतप्रधानपदासाठी पाच जणांची नावं चर्चेत आली आहेत. यात सर्वात पहिले नाव आले ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे. दुसरे नाव आले तेर ममता बॅनर्जी यांचे.आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्यांनी पंतप्रधानपदासाठी अरविंद केजरीवाल यांचेही नाव पुढे केले. सपाच्या प्रवक्त्या जुही सिंग यांनी अखिलेश यांनचे नाव सुचविले आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या चेहऱ्याचा प्रश्न सोडवणे हे विरोधी आघाडीसमोर मोठे आव्हान असणार आहे.