Download App

मुंबईच्या ‘अप्पू‘ ची मूर्खांच्या नंदनवनात भर : वाघनाखांवरील प्रश्नचिन्हावरुन भाजपची आदित्य ठाकरेंवर टीका

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफलजखानाचा वध केला, ती वाघनखे पुन्हा महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. लंडन येथील व्हिक्टोरीया अल्बर्ट म्युझियममधील ही वाघनखे येत्या 16 नोव्हेंबरला परत येणार असून ती तीन वर्षांसाठी भारतात असणार आहेत. याकाळात ही वाघनखे सातारा, नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई इथल्या संग्रहालयांमध्ये ठेवली जाणार आहेत, राज्य सरकारने शासन निर्णय जारी करत याबाबतची माहिती दिली.

दरम्यान, या संपूर्ण निर्णयावरच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनीच वापरलेली आहेत की शिवकालीन आहेत? वाघनखे परतावा म्हणून येणार आहेत की उसनवारी म्हणून? असे प्रश्न ठाकरे यांनी विचारले आहेत. ठाकरे यांच्या प्रश्नांवर “छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करून तू देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेस. तुझ्या या बुद्धीभ्रष्ट विधानामुळे मराठी माणूस संतापला आहे” असे म्हणत भाजपने अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) leader Aditya Thackeray has questioned the decision on tiger claws)

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

माझ्याकडे जीआर आहे, त्यानुसार ही वाघनखे केवळ तीन वर्षांसाठीच महाराष्ट्रात असणार आहेत. तीन वर्षांनंतर ती पुन्हा लंडनच्या संग्रहालयात पाठवली जाणार आहे. त्यामुळे वाघनखे परतावा म्हणून येणार आहेत की उसनवारी म्हणून? यावर मंत्री महोद्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे परत येणार असे आम्हाला सांगण्यात येत आहे. पण ही वाघनखे नक्की छत्रपती शिवाजी माहाराजांनी वापरलेलीच आहेत की शिवकालीन आहेत हे स्पष्ट केले पाहिजे.

कारण ज्या विक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनखे आहेत ती त्यांनी जेम्स ग्रँड डफ या इतिहासतज्ज्ञांच्या संग्रहातील असल्याचे म्हटले आहे. म्युझियमच्या वेबसाईटवर कुठेही ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनीच वापरली आहेत, असे म्हंटलेले नाही. त्यामुळे यावर सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे. जर ती महाराजांचीच असतील तर ती परत आणायलाच हवीत आणि महाराजांचे मंदिर बांधून त्यात ती वाघनखे ठेवली गेली पाहिजेत, अशीही मागणी त्यांनी केली.

भाजपची अत्यंत संतप्त प्रतिक्रिया :

दरम्यान, भाजपने आदित्य ठाकरे यांच्या या प्रश्नावर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आदुबाळा, वय वाढले की बुद्धी वाढतेच असे नाही. मेंदूचा विकास होतो असेही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करून तू देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेस. तुझ्या या बुद्धीभ्रष्ट विधानामुळे मराठी माणूस संतापला आहे. आपल्या कुटुंबातील हे कार्ट असे निपजल्याचे बघून वंदनीय बाळासाहेबांना खूप दुःख झाले असेल. दिल्लीच्या एका पप्पूने आधीच राजकारणात गोंधळ घातला आहे. आता तुझ्या रूपात मुंबईच्या ‘अप्पू‘ ची मूर्खांच्या नंदनवनात भर पडली आहे. तू मराठी माणसाच्या नावावर कलंक आहेस, अशी टीका भाजपने केली आहे.

Tags

follow us