मुंबई : ठाकरे गटाकडून आपल्याला दाव्यांची कागदपत्रे देण्यात आलेली नाहीत, असा आक्षेप घेत शिंदे गटाने कागदपत्रांची मागणी केली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरु असलेली आमदार अपात्रतेची सुनावणी दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली असून 2 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाकडून अॅड. देवदत्त कामत आणि अॅड. असीम सरोदे बाजू मांडणार आहेत. तर शिंदे गटाकडून अनिल साखरे वकील असणार आहेत. (Shivsena MLA disqualification hearing is adjourned for two weeks)
आजच्या सुनावणीत काय झाले याबाबत माहिती देताना अॅड. साखरे म्हणाले, आम्हाला त्यांची कागदपत्रे मिळाली नव्हती. याबाबत आज सांगितल्यानंतर अध्यक्षांनी सुनावणी 2 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. आता आम्हाला त्यांची कागदपत्रे मिळतील, आमची कागदपत्रे त्यांना देऊ. त्यानंतर 2 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे. त्यांनी एकत्रित सुनावणीची मागणी केली होती, मात्र याबाबतची सविस्तर सुनावणी 2 ऑक्टोबरला होणार असून त्याचदिवशी पुढील सुनावणीचे स्वरुप ठरणार आहे, असेही साखरे यांनी सांगितले.
शिवसेनेमध्ये बंड करून बाहेर पडलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे. त्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोडला आहे. मात्र अद्याप देखील त्यावर काहीही निर्णय आलेला नाही. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर ते घटनेशी द्रोह करत असल्याची जोरदार टीका केली आहे.
आमदारांच्या अपात्रतेवरील निर्णय 6 महिन्यांपूर्वीच यायला हवा होता. सुप्रीम कोर्टाने तसे स्पष्ट निर्देश दिले होते. तरी देखील विधान सभेच्या अध्यक्षांनी आणि एक फुल दोन हाफ सरकारने हा निर्णय घेण्यास टाळाटाळ केली. आता त्यांनी जाहीर केलं की, आम्ही निर्णय घेऊ. महाराष्ट्रामध्ये एक घटनाबाह्या सरकार काम करतयं. त्याला कायदेशीर आधार नाही.
महाविकास आघाडीचं सरकार फुट पाडून सरकार पाडलं. त्यात आमदारांवर अपात्रतेची कारवाई ही घटनेतील तरतुदीनुसार होणे गरजेचे आहे. मात्र तरी देखील विधानसभेचे अध्यक्ष पक्ष बदलण्याचा ज्यांना अनुभाव आहे. पक्षांचतर ज्यांचा धर्म आहे. ते कायद्याचे जाणकार आहेत. तरी देखील ते आमदार अपात्रतेच्या निर्णयावर चाल ढखल करत आहेत. त्यामुळे त्यांनी कायद्याशी आणि घटनेशी द्रोह केला, असं मी मानतो, असंही राऊत म्हणाले.