Sanjay Gaikwad News : आपल्या वक्तव्यांनी सतत चर्चेत राहणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा (Sanjay Gaikwad) चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांची चर्चा वेगळ्या कारणाने होत आहे. शिळे आणि निकृष्ट दर्जाचे जेवण दिले म्हणून गायकवाड यांचा संताप अनावर झाला. त्यांनी आमदार निवासातील कँटीनमध्ये राडा घातल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी त्यांनी कँटीनच्या व्यवस्थापकालाही सुनावलं. तसेच येथील एका कर्मचाऱ्याला त्यांनी बेदम मारहाण केल्याचेही समोर आले आहे. आमदार गायकवाड यांनी बनियन अन् टॉवेलवरच येत कँटीनमध्ये जोरदार राडा घातला.
आमदार गायकवाड यांनी काल आमदार निवासातील कँटीनमध्ये जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यांना जेवण देण्यात आलं. परंतु, त्यांच्या ताटातील भात आणि वरण शिळं होतं त्याचा वास येत होता असा आरोप आमदार गायकवाड यांनी केला. या प्रकाराने त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी थेट कँटीनच्या व्यवस्थापकालाच फैलावर घेतलं. याआधी देखील मी कँटीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार दिली होती. आज मी हा मुद्दा सभागृहात मांडणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल; महाराष्ट्र पोलिसांबद्दल ‘ते’ वक्तव्य भोवलं
पावसाळी अधिवेशनासाठी गायकवाड सध्या मुंबईत आहेत. आकाशवाणी आमदार निवासात त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. येथील कँटीनमध्ये त्यांना खराब जेवण मिळाल्याचं कारण पुढे करत त्यांनी जोरदार राडा घातला. गायकवाड यांनी कँटीनच्या कर्मचाऱ्याला थेट बुक्क्यांनी मारहाण केली. कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली आणि ठोसे मारले. यानंतर त्यांनी कँटीन चालकालाही लक्ष्य केले.
आकाशवाणी आमदार निवासस्थानी निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याने आमदार संजय गायकवाड यांचा राडा.. @sanjaygaikwad34
कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला आमदार गायकवाड यांनी फटकावलं
–#SanjayGaikwad #Aakashwanicanteen #AakashWani #MLASanjayGaikwad #LetsUppMarathi pic.twitter.com/QeXyRot8bm— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 9, 2025
आमदार निवासातील कँटीनमधून जे जेवण मिळालं ते निकृष्ट दर्जाचं होतं. या अन्नाला काहीतरी वास येत होता असा दावा आमदार गायकवाड यांनी केला. इतकेच नाही तर त्यांनी बनियन आणि टॉवेलवरच कँटीन गाठले. कँटीनमधील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. प्लास्टिकच्या पिशवीत आणलेल्या वरणाचा वास घ्यायला सांगितला. याच वेळी त्यांनी एका कर्मचाऱ्याला बोलावून घेतलं. त्यालाही या वरणाचा वास घ्यायला सांगितलं. नंतर लगेचच त्याच्या कानशिलात ठेऊन दिली. ठोसाही मारला. तो कर्मचारी गडबडून खाली पडला. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.