Sanjay Raut Criticized BJP on Ram Mandir : देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे (Lok Sabha Election 2024) वाहत आहेत. राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असली जागावाटप अद्याप झालेलं नाही. जागावाटपावरून विरोधी आघाडीत धुसफूस वाढू लागली आहे. तर दुसरीकडे अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir) सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. विरोधकांनी या सोहळ्याला राजकारणाशी जोडत भाजपवर प्रहार करण्यास सुरुवात केली आहे. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर सडकून टीका केली. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अयोध्येतील राम मंदिरावरून प्रचंड राजकारण सुरू असल्याचं म्हटलं. भाजपकडून अयोध्येच्या राम मंदिरावरून इतकं राजकारण सुरू आहे की आता 22 जानेवारी रोजी श्रीरामांना उमेदवारी देण्याची घोषणाच फक्त बाकी राहिली आहे. अयोध्येतून आम्ही श्रीरामांना उमेदवारी देतो इतकेच म्हणणे आता बाकी राहिले आहे.
मविआतील जागावाटप मेरिटनुसारच होईल, राऊत नरमले
यानंतर राऊत यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपावर भाष्य केलं. मागील दोन दिवसांपासून काँग्रेसवर तुटून पडणारे राऊत आज मात्र संयमित दिसत होते. माझ्या वक्तव्यांचा विपर्यास करण्यात आला. महाविकास आघाडीतील तीनही पक्षात चांगला ताळमेळ आहे. मतभेद असल्याच्या ज्या बातम्या आल्या त्यात काहीच तथ्य नाही. जागावाटपावरून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. महाराष्ट्रातील 48 जागांचे वाटप मेरिटनुसारच होईल. जिंकेल त्याची जागा हे आमचे सूत्र आधीपासूनच ठरलं आहे, असे राऊत म्हणाले.
एकत्र लढलो तर 40 जागा जिंकू
यानंतर राऊत यांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यावरही स्पष्टीकरण दिलं. काँग्रेस शून्य आहे असं मी कधीच म्हणालो नाही. काँग्रेसकडे एकही खासदार सध्या नाही असं मला म्हणायचं होतं. परंतु, महाराष्ट्रात एकत्र लढून आम्ही जवळपास 40 जागा जिंकू शकतो एवढी आमची ताकद आहे. आज देशात असा कोणताही पक्ष नाही जो स्वबळावर जिंकू शकतो. भाजपला तर जिंकण्यासाठी ईव्हीएमची गरज पडते, अशी खोचक टीका राऊत यांनी केली. आज आमच्याकडे सहा खासदार आहेत. मात्र आम्ही आधीच्या आकड्यावर पोहोचू शकतो, असेही राऊत म्हणाले. दरम्यान, राऊतांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेस नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.