Sanjay Raut on Third Alliance : काँग्रेसने थेट मुख्यमंत्रिपदावर दावा करू नये, अजून जागावाटप बाकी आहे. आमच्यामुळेच काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते असा काही निर्णय घेणार नाहीत अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाला इशारा दिला. काँग्रेसचे स्थानिक नेते निवडणुकीआधीच मुख्यमंत्रिपदावर दावा करू लागले आहेत. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. तरी देखील काँग्रेस नेते अशी वक्तव्ये करत आहेत. काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनीही काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल असे स्पष्ट केले होते. या नेत्यांच्या वक्तव्यांवरच खासदार राऊत यांनी आज काँग्रेसला थेट शब्दांत इशारा दिला.
महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसच्या सध्याच्या धोरणावर राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच सूचक शब्दांत काँग्रेसला इशाराही देऊन टाकला. राऊत म्हणाले, आत्मविश्वास सगळ्यांचाच वाढला आहे फक्त काँग्रेसचाच (Congress Party) कशाला वाढला पाहिजे? आत्मविश्वास महाविकास आघाडीचाच वाढला आहे. तो लोकसभेचा (Lok Sabha Elections) आत्मविश्वास होता.
विधानसभेच्या आत्मविश्वासासाठी आपल्याला परत एकदा काम करावं लागणार आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांना एकत्र यावं लागेल. आत्मविश्वास वाढला म्हणून ते काही एकटे लढणार नाहीत ना. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? जर आत्मविश्वास वाढला असं कुणाला वाटत असेल तर कसा वाढला हा अभ्यासाचा विषय आहे.
लोकसभेला ज्या पद्धतीने तिन्ही पक्ष एकत्र लढले त्याच पद्धतीने विधानसभेलाही एकत्र लढू यात काहीच बदल होणार नाही. लोकसभेला जागावाटप जास्त सोपं होतं कारण फक्त 48 जागांचच वाटप करायचं होतं. विधानसभेला 288 जागा आहेत. तीन पक्ष आहेत आणखीही काही लहान पक्ष आहेत त्या सगळ्यांना सामावून घेण्याची आमची भूमिका आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Elections) पार्श्वभुमीवर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी स्थापन (Third Alliance) करण्यात आली. काल पुण्यात या आघाडीची घोषणा करण्यात आली. या आघाडीवरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) आज राज्यात तिसरी आघाडी कशासाठी स्थापन झाली? या आघाडीचा काय उद्देश आहे? या प्रश्नांची उत्तरे देत सत्ताधाऱ्यांवर तिखट शब्दांत टीका केली.
राऊत म्हणाले, तिसरी आघाडी जी असते ती कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवलेली असते. केंद्रात आणि राज्यात जे सत्तेत असतात. त्यांच्यासमोर काही अडचणीचे विषय असतात तेव्हा तिसरी आघाडी बनवून विरोधकांच्या मतांत कशी दुफळी माजवता येईल यासाठी काम करतात. आतापर्यंतचा इतिहास आणि अनुभव तेच सांगतो. खरं म्हणजे महाविकास आघाडी (MVA) आणि महायुती या दोघांतच लढत आहे. पण महाविकास आघाडीची मतं थोडी फार कमी करता आली त्यासाठी काही नवीन आघाड्या स्थापन करायच्या. त्यासाठी पैशांचा वापर करायचा पदांचा वापर करायचा असं धोरण मला सध्या दिसत आहे.
बच्चू कडूंचा अखेर महायुतीला रामराम; संभाजीराजे, शेट्टींसोबत तिसरी आघाडी स्थापन