Download App

“भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर करू शकता, हिंमत असेल तर..”, राऊतांचं फडणवीसांना चॅलेंज!

आम्हाला खोटे गुन्हे दाखल करून अटक कराल. देवेंद्रजी तुमच्यात हिंमत असे तर बीडमधील खऱ्या आरोपींनी पकडून दाखवा.

Sanjay Raut Challenges Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच छगन भुजबळ यांची नाराजी आणि परभणी, बीड येथील घटनांचा उल्लेख करत फडणवीसांना चॅलेंजही दिलं. आपण भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर करू शकता. पण ज्याच्यावर एका खूनाच्या कटकारस्थानाचा संशय आहे अशा व्यक्तींना दूर ठेऊ शकत नाही. आम्हाला खोटे गुन्हे दाखल करून अटक कराल. देवेंद्रजी तुमच्यात हिंमत असे तर बीडमधील खऱ्या आरोपींनी पकडून दाखवा असे आव्हान संजय राऊतांनी दिलं.

राहुल गांधींचा परभणी दौरा निव्वळ राजकीय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र

राऊत पुढे म्हणाले, या देशामध्ये विरोधी पक्षाने, जनतेने, नागरिकाने काय करावं, कुठे जावं, काय बोलावं, काय खावं कोणत्या भूमिका मांडाव्या हे नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस ठरवणार का ? या देशात लोकशाही आहे. महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे हे फडणवीस यांनी समजून घ्यावं. मिस्टर फडणवीस बीड आणि परभणी संदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे रोष आहे अशी लोकं आपल्या मंत्रिमंडळात आहेत आपण त्यांना घेतलं आहे. न्यायाच्या गोष्टी करत आहात स्वतः एकदा बीडला जा. गृहमंत्री म्हणून गेलात का एकदा बीडला ? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

परभणी, बीडला जाण्याची भीती वाटते का?

राहुल गांधी बीडला गेले किंवा परभणीला गेले यामुळे आपलं पित्त का खवळावं ? राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. भारतीय संविधानाने त्यांना जो दर्जा दिला आहे लोकसभेत संसदेत विरोधी पक्षनेता म्हणून तो कॅबिनेट मंत्र्याचा आहे. तो दर्जा त्यांना नरेंद्र मोदी अमित शहा आणि आपण दिलेला नाही. जेव्हा आपल्या हातात होतं तेव्हा विरोधी पक्षनेते पद त्यांना मिळू दिले नाही. आता लोकसभेच्या आकडेवारीनुसार आपलं बहुमत नाही हे आधी मान्य करा. मोदींना बहुमत नाही मोदी कुबड्यांवर आहेत. राहुल गांधी परभणीत आले आपण जायला पाहिजे होतं. गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून आपण गेलात का? आपल्याला भीती वाटते तिथे जाण्याची. भीती वाटते गेलात तरी बहुतेक सैन्य घेऊन जाल आपण अशी टीका संजय राऊत यांनी केली.

महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा भयंकर पण मुख्यमंत्री फडणवीस..संजय राऊतांची घणाघाती टीका

खऱ्या आरोपींना पकडा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरूनही संजय राऊत यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. राऊत म्हणाले, ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे अशा व्यक्ती आपल्या मंत्रिमंडळात आहेत. आपण छगन भुजबळ यांना दूर करू शकता मंत्रिमंडळातून पण एका खूनाचा कटकारस्थानाचा संशय ज्यांच्यावर आहे अशा व्यक्तीला मंत्री मंडळापासून दूर ठेवत नाही कारण तुमचं जातीचं राजकारण आहे.

तुम्ही एक समाज वापरून घेत आहात. छगन भुजबळ यांना तुम्ही दूर ठेवता काही आमदारांचा म्हणे विरोध आहे. पण जनतेचा विरोध आहे बीड महाराष्ट्रातल्या मोठ्या समाजाचा विरोध आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कारस्थानात ज्यांच्या संशयास्पद हात आहे अशी व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात नको अशा घोषणा अजित पवार यांच्यासमोर देण्यात आल्या आहेत. बीडला मंत्री जाऊन भाषणं करत आहेत. खऱ्या आरोपींना पकडा ना असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.

follow us