ठाणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक आणि माजी वरिष्ठ सनदी अधिकारी अनिल गायकवाड (Anil Gaikwad) यांचा मुलगा अश्वजीत गायकवाड याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. प्रेयसी प्रिया सिंग हिच्या अंगावर गाडी घालण्याचा आणि तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अश्वजीत याच्यावर आहे.
याप्रकरणात अद्याप अश्वजीतची चौकशी करण्यात आलेली नाही, पण त्याच्या बेपत्ता कारचा शोध घेण्यात येत आहे. सोबत घटनास्थळावरील लोकांचे आणि साक्षीदारांचे जबाब नोंदविणे आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Special team to probe Maharashtra bureaucrat’s son allegedly running over woman)
याबाबत प्रिया सिंगने इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अश्वजीतने फोन केल्यानंतर 11 डिसेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता घोडबंदर रोडवरील एका हॉटेलजवळ कौटुंबिक कार्यक्रमात भेटायला गेले. पण माझ्या लक्षात आले की तो विचित्र वागत आहे आणि एकांतात बोलण्याची मागणी करत आहे.
पण मी नकार दिल्यानंतर त्याने मला थप्पड मारली, माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, मी त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने माझ्यावर हात उचलला, मला मारहाण केली, माझे केस ओढले. तेव्हा त्याच्या मित्राने मला जमिनीवर ढकलले, फोन आणि बॅग घेण्यासाठी मी माझ्या कारकडे धावली आणि तेव्हाच अश्वजीतने त्याच्या ड्रायव्हरला गाडी चालविण्यास सांगितले.
माझ्या पायांवर गाडी गेल्यानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले. या अपघातानंतर “माझ्या उजव्या पायाची तीन हाडे तुटली आहेत, त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. माझ्या डाव्या खांद्यापासून खालीपर्यंत मला खोलवर जखमा आहेत, असेही दुःख प्रिया सिंगने व्यक्त केली.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना अश्वजीत गायकवाड याने प्रिया सिंगचे सर्व आरोप फेटाळून लावत या संपूर्ण घटनेला पैसे लुटण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. जे काही चित्रित केले गेले आहे ते खोटे आहे. ती माझी फक्त एक मैत्रीण आहे. ती मद्यधुंद अवस्थेत हॉटेलमध्ये आली होती. मी एका कौटुंबिक कार्यक्रमात होतो. पण मला तिच्याशी बोलण्यास भाग पाडले. मी नकार दिल्यावर तिने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
माझ्या मित्रांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्यांनाही मारहाणही केली. माझा ड्रायव्हर शेळके याने माझी कार चालू केली, जेणेकरून ती बाजूला पडेल, ती पडली. पण अपघात हा हेतुपुरस्सर नव्हता, हा केवळ माझ्याकडून पैसे उकळण्याचा एक मार्ग आहे. मी तिला यापूर्वीही पैसे दिले आहेत आणि माझ्याकडे सर्व रेकॉर्ड आहेत, असाही दावा अश्वजीतने केला आहे.
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांना विनंती :
प्रिया सिंग म्हणाली, काल रात्री काही पोलिस आले होते. पोलिसांनी जबरदस्तीने काहीतरी सही करण्याचा प्रयत्न करत होते. मी नकार दिला कारण माझ्याकडे वकील नव्हते आणि माझ्या कुटुंबातील कोणीही नव्हते. ते मला बळजबरी करत होते, मला सांगत होते की आता सही करा आणि उद्या काय होते ते पहा. प्रिया सिंग यांनी सही केली नाही त्यामुळे पोलिस रागावले आणि निघून गेले. त्यानंतर प्रियाने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे न्यायाची मागणी केली.