सध्या कामाच्या ठिकाणी (Mumbai) महिला आणि पुरुष एकत्रच काम करत असतात. अशा ठिकाणी काही वेळा महिलांना असहज वाटणाऱ्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. अशाच एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे.
कार्यालयीन वातावरणात सहकारी महिलेकडे (विशेषत: तिच्या छातीकडे) एकटक पाहणे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे, मात्र ते ‘चोरून पाहणे’ अशा गुन्ह्यात मोडत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. नुकतेच न्या. अमित बोरकर यांच्या एकल पीठासमोर एका महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी झाली. यामध्ये एका इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यावर महिला सहकाऱ्याच्या छातीकडे चोरून पाहिल्याचा आरोप होता.
लिंगपिसाटला सुट्टी नाहीच! पोलिस कोठडीतून सुटताच न्यायालयीन कोठडीत अडकला, सुनावणीत काय घडलं?
महिला सहकाऱ्याकडे टक लावून पाहिल्याचे खरे मानले, तरी देखील ते कलम 354 (सी) अंतर्गत येत नाही. ‘चोरून पाहणे’ अशा गुन्ह्यात त्याचा समावेश करता येणार नाही, असे न्यायालयीन आदेशात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावरील गुन्हा रद्द करण्यात आला आहे. कलम 354 (सी) अंतर्गत एखाद्या महिलेकडे चोरून पाहणे गुन्हा ठरतो.
महिलेला गोपनीयतेची अपेक्षा असताना म्हणजेच खासगी कृती करताना तिच्याकडे पाहणे किंवा तिचे चित्रण करणे, हा गुन्हा मानला जातो. यामध्ये शौचालय किंवा स्वच्छतागृहाचा वापर करताना किंवा शारीरिक संबंध ठेवत असताना महिलेला गोपनीयतेची अपेक्षा असते. अशावेळी तिच्याकडे चोरून एकटक पाहणे किंवा त्याचे चित्रण करणे, हा गुन्हा आहे. मात्र, केवळ छातीकडे पाहणे हे या कलमांतर्गत येत नाही. त्यामुळे हा गुन्हा ठरत नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
