मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) आणि अनिल देसाई (Anil Desai) यांचे सचिव दिनेश बोभाटे (Dinsesh Bobhate) यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठविले आहे. आजच चौकशीसाठी हजर राहण्याचे या समन्समध्ये सांगितले आहे. कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात अमोल किर्तीकर यांना तर बेहिशोबी संपत्ती प्रकरणात बोभाटे यांना समन्स पाठविण्यात आले आहे. (Summoning Amol Kirtikar and Dinesh Bobhate for questioning by ED)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठीची (Lok Sabha) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करुन एकूण १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तीकर आणि मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई या दोघांनाही उमेदवारीची घोषणा झाली आहे. त्याचवेळी ईडीची नोटीस आल्याने टायमिंगबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात अमोल किर्तीकर यांची मागील काही दिवसांपासून चौकशी सुरू आहे. त्यानंतर आता उमेदवारी जाहीर झाल्याच्या दिवशीच ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स पाठविले आहे. यापूर्वी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना अटक झाली आहे. त्यानंतर आता अमोल कीर्तीकर यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आल्याने त्यांच्याही डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
दिनेश बोभाटे यांच्यावर उत्पन्नापेक्षा दोन कोटी 60 लाख रपयांची अधिक संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे मागवून ईडीने तपास सुरु केला होता. त्यानंतर आता बोभाटेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बोभाटे जरी खासगी सचिव असले तरी ते एका विमा कंपनीतही पदावर आहेत. त्यांच्या इथल्या उत्पन्नापेक्षा त्यांच्याकडे दोन कोटी साठ लाखांची अधिकची संपत्ती आढळून आली आहे. हे पैसे कुठून आले, कसे आले, या उत्पन्नाचा स्त्रोत काय? याबाबत त्यांची चौकशी होणार आहे.