Jaydeep Apte : मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue ) कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला (Jayadeep Apte) पोलिसांनी अटक केली. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांपासून जयदीप फरार होता. अखेर जयदीपला त्याच्या कल्याणमधील घरातून पोलिसांनी अटक केली. जयदीपच्या शोधासाठी सात पथकांकडून शोध मोहिम सुरू होती, अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आता हा जयदीप आपटे पोलिसांच्या जाळ्यात आला तरी कसा याचीही माहिती समोर आली आहे. अंधाराचा फायदा घेत कुटुंबियांना भेटण्यासाठी कल्याण येथील त्याच्या राहत्या घरी आला होता. याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केली.
जयदीप आपटे संघाचा माणूस, त्याला मूर्तीकलेचा कोणताही अनुभव नाही; पटोलेंचा आरोप
पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात होता. त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. विरोधकांकडून मात्र राज्य सरकारला धारेवर धरले जात होते. राज्य सरकारनेच जयदीपला लपवून ठेवल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे पोलिसांकडून शोध मोहिमेला गती दिली होती. या घटनेनंतर जयदीप आपटेचे कुटुंबीय शहापूरला नातेवाईकांकडे गेले होते. पोलिसांनी तिथे जाऊन जयदीपची पत्नी आणि आईची चौकशी केली होती. त्यानंतर जयदीपचे कुटुंबीय पुन्हा कल्याणला आले होते.
जयदीप त्याच्या पत्नीच्या संंपर्कात होता. घरी येणार असल्याचे त्याने पत्नीला सांगितले होते. त्यानंतर त्याच्या ही माहिती पोलिसांना दिल्याचे सांगितले जात आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन पथके तयार केली. एक पथक कल्याण रेल्वे स्थानकावर तर एक पथक आपटे राहत असलेल्या इमारतीच्या परिसरात तैनात करण्यात आले होते.
आपटे कसाऱ्यावरून लोकल ट्रेनने कल्याणला उतरला. यानंतर त्याने रिक्षाने दूध नाक्यापर्यंत प्रवास केला. आपल्याला कुणी ओळखू नये यासाठी त्याने डोक्यावर टोपी, तोंडाला मास्क आणि रुमाल गुंडाळला होता. त्याच्या हातात दोन बॅग होत्या. इमारतीच्या गेटवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ओळखपत्र पाहूनच नागरिकांना आत सोडले जात होते हे त्याने दुरूनच पाहिले. तरीदेखील आपटे इमारतीजवळ आला. पोलिसांनी त्याला ओळखपत्र मागितले त्याने नकार दिला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. हाच जयदीप आपटे असावा असे पोलिसांना वाटले.
यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या नावाने आवाज दिला. घाबरलेल्या अवस्थेत तो ढसाढसा रडायला लागला. पोलिसांनी लागलीच त्याला ताब्यात घेतलं. घरी जाऊ देण्यासाठी तो गयावया करत होता. परंतु, पोलिसांनी त्याला परवानगी दिली नाही. एवढ्या वेळात नागरिकांची गर्दी जमा झाली होती. जयदीपचे कुटुंबीयही खाली आले होते. यानंतर पोलिसांनी त्याला घरी न पाठवता डीसीबी स्कॉडकडे नेले.
मोठी बातमी! शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक