100 years of Congress convention : काँग्रेस पक्षाच्या महाअधिवेशनाला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त शताब्दी महोत्सव कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना आमंत्रित करण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे. याबाबत राज्याचे कायदा व संसदीय खात्याचे मंत्री एच. के. पाटील यांनी बंगळूर येथील एका कार्यक्रमात तसे सूतोवाच केले आहेत.
डिसेंबरमध्ये अधिवेशनाचा शताब्दी महोत्सव साजरा केला जाणार आहे. बराक ओबामा यांनी महात्मा गांधींबाबत बोलताना, गांधीजी हे केवळ भारताचे नसून गांधीजी हे जागतिक स्तरावरील नेते असल्याचं अनेकदा सांगितलं आहे. यामुळे कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीद्वारे बेळगावात आयोजित करण्यात येणाऱ्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमास ओबामा यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे मंत्री के. एच. पाटील यांनी सांगितलं आहे.
China : भारतीय शेअर बाजार चीनमुळे कोसळतोय का?, FII ने विकले इतक्या कोटी रुपयांचे शेअर्स
बेळगावात २६ डिसेंबर १९२४ रोजी महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ३९ वे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले होते. येथे झालेल्या या अधिवेशनावेळी तत्कालीन राष्ट्रीय स्तरावरचे नेते या ठिकाणी आले होते. महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेले हे काँग्रेसचे पहिले आणि अखेरचे अधिवेशन ठरले होते. या ऐतिहासिक घटनेला २६ डिसेंबर २०२४ रोजी शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत.
काँग्रेस अधिवेशनाचा हा शताब्दी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. बराक ओबामा यांचा बेळगाव दौऱ्याचा कार्यक्रम निश्र्चित झाल्यास या अधिवेशनाला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळणार आहे. तसंच, बेळगावचे नावही जागतिक स्तरावर चमकणार आहे.