उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांना वाचविण्यात यश आले आहे. रॅट होल मायनिंग (rat hole mining) या पद्धतीने तब्बल 17 दिवसांनंतर या मजुरांना बाहेर काढण्यात आले. एकूण 58 मीटर खोदकाम करुन त्यात 800 मीमी व्यासाचा पाईप टाकून मजुरांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. या मजुरांच्या सुखरुप सुटकेनंतर संपूर्ण देशातून समाधान व्यक्त होत आहे.
पण यामुळे रॅट होल मायनिंग म्हणजे काय हा असा सवाल विचारला जात आहे. याच पद्धतीवर सरकारकडून बंदी घालण्यात आली होती. मात्र आज तिच पद्धत या 41 मजुरांसाठी नवीन जीवन देणारी ठरली आहे. यामुळे रॅट होल मायनिंग म्हणजे काय? खाणकामाची ही पद्धत धोकादायक का आहे? आणि यावर सरकारकडून बंदी का घालण्यात आली होती, हे पाहणे गरजेचे ठरते. (41 laborers trapped in Silkyara tunnel were rescued after 17 days by rat hole mining method.)
ईशान्य भारतातील आदिवासी भागातील काही अपवाद वगळता भारतातील जवळपास सर्वच खाणींचे राष्ट्रीयकरण झाले आहे. त्यामुळे सरकारकडून खाण परवाना मिळाला असेल तरच तुम्ही या खाणींमधून कोणतेही खनिज काढू शकता. पण भारतात जशी वीज चोरी होती तशीच खनिजांचीही चोरी होते. मेघालयात कोळसा, लोहखनिज, चुनखडी आणि डोलोमाइटचे प्रचंड साठे आहेत. ही खनिजे काढण्यासाठी स्थानिक लोक एकत्र येतात आणि उदरनिर्वाहासाठी खनिजांची चोरी करतात. यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीला रॅट-होल मायनिंग म्हणतात.
यासाठी स्थानिक लोक एक लांब अरुंद बोगदा तयार करतात आणि याच बोगद्यातून ते खनिजांपर्यंत पोहोचतात. खाण प्रक्रियेत अवलंबलेल्या या जुन्या पद्धतीला रॅट-होल मायनिंग म्हणतात. उंदाराच्या बिळात शिरल्याप्रमाणे छोट्या बोगद्यातून बसून आत जावे लागते या मुळे या पद्धतीला रॅट होल म्हंटले जाते. या खाणीत लहान मुले किंवा बारीक अंगकाठीच्याच व्यक्ती काम करतात. या अरुंद बोगद्यातून रेंगाळत, एक व्यक्ती खाणकाम करते आणि ट्रॉलीमध्ये खनिजे बाहेर काढते. खाणकामाच्या या पद्धतीला रॅट होल मायनिंग म्हणतात.
उत्तराखंडच्या घटनेत 800 मीमी व्यासाची लोखंडी पाईप या बोगद्यात टाकण्यात आली होती. मात्र इतर ठिकाणच्या रॅट होल मायनिंमध्ये कोणत्याही प्रकारची पाईप नसते. मातीच्याच बोगद्यातून आत जावे लागते आणि बाहेर यावे लागते. हा भाग इतका अरुंद असतो की त्यात ना उभे राहता येते ना बसायला जागा असते. आत गेल्यावर बाहेर मुसळधार पाऊस पडतो आणि अरुंद वाट पाण्याने भरते. पाणी साचल्यामुळे एकतर खडक कमकुवत होऊन रस्ता खचतो, पूर्ण मार्गच बंद होतो. किंवा तो इतका पाण्याने भरतो की बाहेर पडण्याचे मार्गही पाण्याने काठोकाठ भरतात.
अशा स्थितीतीत हे काम तिथेच अडकून पडतात. त्यांना बाहेर पडणे अवघड होते. या मजुरांना अनेकदा जीव गमवावा लागतो. अलीकडेच, मेघालयात पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे रॅट होल मायनिंग करणाऱ्या बोगद्यात माती खचली आणि वाट पूर्णपणे बंद झाली. यात तब्बल पाच अल्पवयीन मुले अडकली होती. सरकार आणि प्रशासनाने अथक प्रयत्न करूनही या मुलांना सुखरुप बाहेर काढता आले नव्हते. .
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने 2014 पासून रॅट होल मायनिंग आणि इतर अनेक वैज्ञानिक आणि बेकायदेशीर खाणकामांवर बंदी घातली आहे. एनजीटीने बंदी घातली असतानाही या परिसरात रॅट होल मायनिंगचे काम अवैधरित्या सुरूच आहे.