दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सुरतमधील कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला आणि दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल दिला. या निकालामुळे राहुल गांधी यांची खासदारकी त्यांना पुन्हा मिळणार आहे. याशिवाय काँग्रेस पक्षासह संपूर्ण विरोधी पक्षात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या एका निकालाचा राहुल गांधी, काँग्रेस पक्ष आणि विरोधी आघाडीच्या दृष्टीने काय फायदा आहे, हे पहावे लागणार आहे. (5 political Meanings of Supreme Court Verdict on Rahul Gandhi)
राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा मिळणार :
राहुल गांधी यांना सुरत येथील कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. मात्र आता या निकाल आणि शिक्षा अशा दोन्हीला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी आता परत मिळणार आहे. मात्र ती कधी याचे सर्वाधिकार लोकसभा सचिवालयाच्या हातात असणार आहेत.
राहुल गांधी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवू शकतील :
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राहुल गांधींचा 2024 ची लोकसभा निवडणूक लढविण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. जर कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसती तर मात्र ते 2024 ची लोकसभा निवडणूक लढवू शकले नसते. सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आणि निर्णय या दोन्हीवरून हे स्पष्ट झाले आहे की, राहुल गांधी केवळ संसदेतच परतणार नाहीत तर 2024 च्या निवडणुकीत उमेदवार म्हणूनही ते दिसणार आहेत.
राहुल यांच्या राजकीय कारकिर्दीला संजीवनी मिळाली :
मोदी आडनाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राहुल गांधींच्या राजकीय कारकिर्दीला संजीवनी मिळाली आहे. या कायदेशीर लढाई दरम्यान त्यांना देशभरातून मोठी सहानुभूती मिळालेली दिसली. तर न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते म्हणाल्या, आता त्यांना संसदेपासून दूर ठेवण्याचे काही कारण नाही. मनमानी आणि एककल्ली कारभाराला हा धक्का आहे. अविश्वास ठरावावरील चर्चेवेळी राहुल गांधी सभागृहात उपस्थित राहतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
इंडिया आघाडीत नवचैतन्य :
26 विरोधी पक्षांची नवी युती असलेल्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुझिव्ह अलायन्स अर्थात, इंडियासाठीही राहुल गांधी यांच्याबाबतचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
दिल्लीतला अधिकृत निवासस्थान पुन्हा मिळेल :
संसदेचे सदस्यत्व रद झाल्यानंतर राहुल गांधींना दिल्लीतील त्यांचे निवासस्थान रिकामे करावे लागले होते. राहुल गांधींचे घर रिकामे करताना काँग्रेस नेत्यांनी ‘माझे घर, राहुल गांधींचे घर’ अशी मोहीम सुरू केली होती. आता मात्र संसद सदस्यत्व बहाल केल्यानंतर राहुल गांधींना दिल्लीत पुन्हा घर मिळणार आहे.