50,000 Jobs Risk In IT And Tech Industry : भारताची तंत्रज्ञान क्षेत्रातील (Tech Industry) स्थिती या वर्षी गंभीर आव्हानांना सामोरे जात आहे. एका अहवालानुसार, वर्ष 2025 च्या अखेरपर्यंत सुमारे 50 हजारांहून अधिक कर्मचारी नोकरी गमावू शकतात. अनेक कंपन्यांनी आधीच मोठ्या प्रमाणावर ‘सायलेंट ले-ऑफ’ म्हणजेच शांतपणे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
टीसीएससह मोठ्या कंपन्यांत कपातीची लाट
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने जुलै महिन्यात घोषणा केली होती की, मार्च 2026 पर्यंत ते त्यांच्या एकूण कर्मचार्यांपैकी सुमारे 2 टक्के म्हणजेच 12 हजार लोकांना कामावरून कमी करतील. मात्र, ही परिस्थिती फक्त टीसीएसपुरती (TCS) मर्यादित नाही. इतर अनेक मोठ्या आणि मध्यम स्तरावरील आयटी कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांना स्वतःहून राजीनामा देण्यास किंवा नवीन नोकरी शोधण्यास (Jobs Risk) सांगत आहेत. अंदाजानुसार, 2023 आणि 2024 या दोन वर्षांत जवळपास 25 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात (IT And Tech) आले. ही संख्या चालू वर्षात दुप्पट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरी नोकरी शोधण्यास सांगितलं
एका आयटी प्रोफेशनलने माध्यमांशी बोलताना आपला अनुभव सांगितला. त्यांनी म्हटले, एका दिवशी HR ने मला बोलावलं आणि सांगितलं की आता कंपनीला माझी गरज नाही. मला तत्काळ ऑफिस सोडण्यास सांगितलं. कारण दिलं की माझं परफॉर्मन्स समाधानकारक नाही. तीन महिन्यांचा पगार देऊन मला कमी करण्यात आलं. अशाच प्रकारे इतर अनेक कंपन्या देखील कर्मचाऱ्यांना सावकाश आणि गोपनीयपणे कमी करत आहेत. एका कर्मचाऱ्याने सांगितले की, माझ्या मॅनेजरने सांगितलं की, मी त्या यादीत आहे ज्यांना कंपनीने दुसरी नोकरी शोधण्यास सांगितलं आहे. मला तीन महिन्यांचा वेळ दिला गेला.
AI वाढवतेय बेरोजगारी
तज्ञांच्या मते, कंपन्या आता आपल्या व्यवसायात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर करत आहेत. त्यामुळे अनेक इंजिनियरिंग आणि पुनरावृत्ती होणारी कामं ऑटोमेशनकडे वळत आहेत, आणि मानवी कामगारांची गरज कमी होत आहे. TCS आणि Accenture यांनी मिळून आतापर्यंत जागतिक स्तरावर 23 हजारांहून अधिक नोकऱ्या कमी केल्या आहेत. Accenture ने आपल्या खर्चात कपात करण्यासाठी 865 दशलक्ष डॉलर्सच्या (₹7200 कोटींच्या) योजनेअंतर्गत जून ते ऑगस्ट दरम्यान 11,000 कर्मचाऱ्यांना कमी केलं.
इतर कंपन्याही त्याच वाटेवर
काही मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये दररोज सुमारे 300 कर्मचाऱ्यांचे लॅपटॉप आणि अकाउंट बंद केले जात आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, TCS आणि Accenture यांच्या या निर्णयामुळे आता इतर कंपन्याही खर्च कमी करण्यासाठी आणि AI तसेच डिजिटल साधनांवर अधिक अवलंबून राहण्यासाठी याच पद्धतीचा अवलंब करत आहेत. कंपन्या थेट कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याऐवजी त्यांना स्वतःहून राजीनामा देण्यास सांगत आहेत. ठराविक फॉर्म्युल्यानुसार भरपई देत आहेत.
पारंपरिक पिरॅमिड मॉडेल कालबाह्य
भारतीय आयटी कंपन्या अनेक वर्षांपासून ‘पिरॅमिड मॉडेल’वर काम करत होत्या. या मॉडेलमध्ये वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन करतात. व्यवस्थापनाच्या अनेक पायऱ्या असतात. मात्र, आता AI आणि ऑटोमेशनच्या वाढत्या वापरामुळे हे मॉडेल हळूहळू अप्रासंगिक ठरत आहे. भारताच्या आयटी क्षेत्रात ही सायलेंट लेऑफची लाट गंभीर चिंता निर्माण करत आहे.