जयपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 75.45 टक्के इतके बंपर मतदान झाले आहे. यानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार याबाबत अंदाज बांधले जात आहेत, दावे-प्रतिदावे केले जात आहे. कोणाचे सरकार येणार याचे उत्तर येत्या 3 डिसेंबरलाच निकालातून समोर येईल. पण राजस्थानमध्ये (Rajsthan) झालेले बंपर मतदान कोणासाठी फायदेशीर आणि कोणासाठी नुकसानकारक ठरणार? असाही सवाल विचारला जात आहे. कारण मागील निवडणूक निकालांवर नजर टाकली तर भाजप (BJP) आणि काँग्रेसला (Congress) मिळालेल्या मतांमध्ये अगदीच कमी फरक राहिला होता. (A bumper turnout of 75.45 percent was recorded for the assembly elections in Rajasthan)
2018 च्या निवडणुकीत एकूण मतदानाची टक्केवारी 74.71 टक्के होती. त्यात काँग्रेसला 39.82 टक्के तर भाजपला 39.28 टक्के मते मिळाली होती. त्या निवडणुकीत भाजप अवघ्या 0.54 टक्क्यांच्या फरकाने मागे पडला होता आणि काँग्रेसची सत्ता आली होती. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी 0.74 टक्क्यांनी वाढली आहे. हेच मतदान आपल्यालाच मिळाले आहे, असा दावा काँग्रेस आणि भाजप करत आहेत. या दाव्याच्या आधारेच आपले सरकार सत्तेत येणार असल्याचा दावा काँग्रेस करत आहेत, तर गेहलोत सरकारच्या विरोधात मतदान म्हणत भाजप विजयाचा दावा करत आहे.
यंदाच्या निवडणुकीत आणखी एक लक्षणीय गोष्ट म्हणजे जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण विधानसभा मतदारसंघ मतदानाच्या टक्केवारीत यावेळीही पहिल्या स्थानावर राहिला आहे. गेल्या वेळी या मतदारसंघात सर्वाधिक 87.65 टक्के मतदान झाले होते. यावेळीही 87.79 टक्के मतदानासह हा मतदारसंघ पहिल्या स्थानावर आहे. मागील वेळी पाली जिल्ह्यातील मारवाड जंक्शन 60.42 टक्के मतदानासह सर्वात कमी मतदान झालेला मतदारसंघ ठरला होता. यावेळीही 61.29 टक्के मतदानासह हा मतदारसंघ शेवटच्या स्थानावर आहे. गेल्या वेळेच्या तुलनेत थोडी वाढ झाली असली तरी हा मतदारसंघ शेवटच्या स्थानावर आहे. यामुळे निवडणूक आयोग आणि राजकीय विश्लेषक दोघेही आश्चर्य करत आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 39.82 टक्के तर भाजपला 39.28 टक्के मते मिळाली होती. याशिवाय बसपाला 04.08 टक्के, सीपीएमला 01.23, सीपीआयला 0.12, राष्ट्रवादीला 0.19, इतरांना 05.68 आणि अपक्षांना 9.59 टक्के मते मिळाली होती. 2018 च्या निवडणुकीच्या निकालानंतर एकूण 176 पुरुष आणि 24 महिला आमदार होते. मात्र पोटनिवडणुकीतील बदलांमुळे सध्या 173 पुरुष आणि 27 महिला आमदार आहेत. यामध्ये काँग्रेसचे 100, भाजपचे 73, बसपचे 6, सीपीएमचे 2, इतर पक्षांचे 6 आणि एकूण 13 अपक्षांचा समावेश आहे. त्यानंतर बसपाचे सर्व आमदार काँग्रेसमध्ये दाखल झाले होते