Download App

Adani Share Price : अदानीच्या शेअर्सच्या किंमतीत वाढ, LIC चे काय झाले ?

  • Written By: Last Updated:

मागील एका महिन्यापासून आर्थिक जगात एकाच गोष्टीची चर्चा आहे ते म्हणजे अदानी ग्रुप (Adani Group) आणि बाजारात होत असलेली त्याची घसरण. पण गेल्या चार दिवसापासून हे चित्र बदललेलं दिसलं. याच कारण म्हणजे अदानी ग्रुपमधील एक गुंतवणूक.

जानेवारी महिन्यात अदानी ग्रुपवर पब्लिश झालेल्या हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) अहवालानंतर  अदानी ग्रुपला मोठा फटका बसला. गेल्या महिनाभरापासून अदानी ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कायम लोवर सर्किटवर दिसत होते. पण हेच शेअर आता सावरताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात अदानी ग्रुपच्या लिस्टेड 10 कंपन्यांच्या बाजार भांडवलात म्हणजे मार्केट कॅपमध्ये 1.73 लाख कोटी रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली.

अदानीच्या शेअर्समध्ये वाढ का ?

अदानी ग्रुपच्या शेअर्सच्या या वाढीमागे अदानीचा रोड शो हेच कारण आहे. अदानी यांनी गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये रोड शो केले. यावेळी अदानी ग्रुप गुंतवणूकदारांना आपल्या व्यवसायाची ताकद पटवून देण्यात यशस्वी ठरला आहे. अदानी ग्रुपकडून गुंतवणूकदारांना सांगितले की त्यांच्याकडे कर्जाची परतफेड करण्याची आणि रोख रक्कम उभा करण्याची क्षमता आहे. गौतम अदानी आता येत्या आठवड्यात लंडन, दुबई आणि यूएसमध्येही गुंतवणूकदारासोबत आणखी एक चर्चेची फेरी आखत आहेत.

हेही वाचा :  निवडून येणारी सरकारं पाडली जातायत…कपिल सिब्बलांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा

जीक्यूजी पार्टनरनी 15,000 कोटी गुंतवले

अदानी यांच्या रोडशो सोबत यामागचं आणखी एक कारण म्हणजे युएसस्थित जीक्यूजी पार्टनर यांनी अदानी ग्रुपच्या 4 कंपन्यांमध्ये 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. 24 जानेवारी 2023 रोजी आलेल्या अमेरिकन फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपमधील ही पहिली मोठी गुंतवणूक आहे. GQG पार्टनर या कंपनीमागे भारतीय वंशाचे राजीव जैन नावाचे व्यक्ती आहेत.

जीक्यूजी पार्टनर्सने अदानी एंटरप्रायझेसमधील 3.4 टक्के भागभांडवल सुमारे 5,460 कोटी रुपयांना, अदानी पोर्ट्समधील 4.1 टक्के भागभांडवल 5,282 कोटी रुपयांना, अदानी ट्रान्समिशनमधील 2.5 टक्के भागभांडवल 1,898 कोटी रुपयांना आणि अडाणी ग्रीन मधील 3.5 टक्के भागीदारीसाठी 2,806 कोटी रुपये गुंतवणार आहे.

राजीव जैन कोण आहेत ?

राजीव जैन हे जन्माने भारतीय असून त्यांनी अजमेर विद्यापीठातून अकाउंटिंगचा अभ्यास केला आणि त्यातच पदव्युत्तर पदवी घेतल्याचं फोर्ब्स मध्ये म्हटलंय. त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मियामी मध्ये फायनान्स आणि इंटरनॅशनल बिझनेसमध्ये एमबीए केलं.

यानंतर राजीव जैन यांनी स्विस बँक कॉर्पोरेशनमध्ये इंटरनॅशनल इक्विटी एनालिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. 23 वर्षांच्या अनुभवानंतर त्यांनी जून 2016 मध्ये जीक्यूजी पार्टनर्स ही फर्म सुरू केली. जगभरातील 1000 पेक्षा जास्त संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या मालमत्तेचं व्यवस्थापन ही कंपनी करते. आपल्या ग्राहकांसाठी आर्थिक सल्लागार म्हणूनही काम करते.

हेही वाचा : ऑस्ट्रेलियात घुमला ‘जय भवानी, जय शिवाजी’ जयघोष

शेअर्समध्ये मोठी उसळी

मागील चार सत्रांमध्ये अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. 27 फेब्रुवारीपासून हा शेअर 57.37 टक्क्यांनी वाढून 1,879.35 रुपयांवर बंद झाला. 27 फेब्रुवारीला हा शेअर 1,194.20 रुपयांवर होता. त्यापाठोपाठ अदानी पोर्ट्सचा शेअर 21.77 टक्क्यांनी वाढला तर अदानी विल्मारचा शेअर 21.53 टक्क्यांनी अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 21.53 टक्क्यांनी, अदानी पॉवर 21.47 टक्क्यांनी आणि एनडीटीव्ही 21.47 टक्क्यांनी वाढला आहे.

LICची गुंतवणूकही फायद्यात

अदानी ग्रुपमधील सततच्या घसरणीमुळे काही दिवसापूर्वी अदानी ग्रुपमधील एलआयसीची गुंतवणूक निगेटिव्ह मध्ये गेली होती. पण अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये वाढ झाल्यानंतर एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्यही वाढून 39,000 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एलआयसीची अदानी समूहातील गुंतवणूक 32 हजार कोटींवर आली होती. अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये एलआयसीने सुमारे 30127 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 27 जानेवारीला या गुंतवणुकीचे मूल्य 57,142 कोटी रुपये होते, जे 27 फेब्रुवारीला 32,000 कोटी रुपयांवर आले होते. आता या गुंतवणुकीचे मूल्य पुन्हा वाढू लागले आहे.

Tags

follow us