यथोगाथा: खिशात 1 हजार, IIT चं स्वप्न भंगलं; 20 व्या वर्षी 25 हजार मुलांचा ‘आदर्श’ बनला!

IIT मध्ये शिकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं... पण या पठ्ठ्याने असं काही करून दाखवलं की, आज त्याच्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळतेय!

Adarsh Kumar IIT dream Skillzo Diana Award Success Story

Adarsh Kumar IIT dream Skillzo Diana Award Success Story

Adarsh Kumar IIT dream Skillzo Diana Award Success Story: वयाच्या 14 व्या वर्षी खिशात फक्त 1 हजार रुपये… डोळ्यांत IIT मध्ये शिकण्याचं स्वप्न… आणि मनात काहीतरी मोठं करण्याची जिद्द! पण परिस्थिती अशी की, कोचिंग क्लासची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते. IIT मध्ये शिकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं… पण या पठ्ठ्याने असं काही करून दाखवलं की, आज त्याच्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळतेय! अवघ्या 20 व्या वर्षी 25 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअरच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या या तरुणाला थेट ब्रिटनचा प्रतिष्ठित ‘डायना पुरस्कार’ मिळालाय! स्वतःचं स्वप्न पूर्ण झालं नाही, म्हणून हजारो मुलांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपडणारा हा तरुण नेमका आहे तरी कोण? पाहूयात ही भन्नाट यशोगाथा!

या तरुणाचं नाव आहे आदर्श कुमार! बिहारमधील चंपारण परिसरात राहणाऱ्या आदर्शची घरची परिस्थिती बेताची. आई घरकाम करून कुटुंबाचा आणि त्याच्या शिक्षणाचा खर्च भागवायची. मात्र, मुलाने शिकून मोठं व्हावं, हे तिचं स्वप्न होतं. त्यासाठी स्वतःच्या बचतीतून तिने आदर्शला लॅपटॉप घेऊन दिला. आणि याच लॅपटॉपने त्याच्यासाठी संधींचं नवं जग खुलं केलं.

आदर्शला IIT मध्ये शिकायचं होतं. त्यासाठी वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी तो खिशात फक्त 1 हजार रुपये घेऊन कोटा येथे पोहोचला. पण तिथे गेल्यानंतर त्याला वास्तवाची जाणीव झाली. IIT ची तयारी करायची तर महागड्या कोचिंग क्लासची फी भरावी लागणार होती. पण घरची परिस्थिती पाहता एवढे पैसे आणायचे कुठून? त्यामुळे IIT मध्ये प्रवेश घेण्याचं त्याचं स्वप्न अधुरंच राहिलं.

आदर्शने इथेच एक गोष्ट ठरवली… पैसे नाहीत म्हणून शिकणं थांबवायचं नाही! त्याने सार्वजनिक वाचनालय गाठलं. मोफत वायफायचा वापर करून इंटरनेटवरून माहिती मिळवली. मार्गदर्शकांशी संपर्क साधला. इंटर्नशिप शोधल्या आणि तंत्रज्ञान, कोडिंग, व्यवसाय याबद्दल स्वतः शिकत राहिला. पण स्वतःच्या भविष्याचा विचार करताना आदर्शला आजूबाजूच्या मुलांचंही वास्तव दिसत होतं. अनेक मुलांकडे हुशारी होती, शिकण्याची इच्छा होती; पण योग्य मार्गदर्शन आणि संधी नव्हत्या. आणि याच विचारातून त्याच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली.

विशेष म्हणजे, आदर्शने वयाच्या 13 व्या वर्षीच ‘मिशन बदलाव’ या सामाजिक उपक्रमाची सहस्थापना केली होती. शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित प्रश्नांवर काम करण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता. पण आदर्श इथेच थांबला नाही. 2023 मध्ये, म्हणजे वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी त्याने ‘स्किल्झो’ नावाचं शैक्षणिक व्यासपीठ सुरू केलं. या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कौशल्य विकास, उद्योजकतेचं प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि व्यावसायिक संधी मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू झाला. विशेषतः मोठ्या शहरांपासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत या संधी पोहोचवण्यावर त्याचा भर होता.

आणि आज याच ‘स्किल्झो’च्या माध्यमातून 25 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक संधींशी जोडण्यात आलंय. ज्या वयात अनेक जण स्वतःच्या करिअरचा विचार करत असतात, त्या वयात आदर्श हजारो विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्याचं काम करतोय. त्याच्या या कामाची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेलीय. आदर्शला ब्रिटनचा प्रतिष्ठित ‘डायना पुरस्कार’ मिळालाय. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तरुणांना हा पुरस्कार दिला जातो.

एवढंच नाही, तर 2025 मध्ये आदर्शने आणखी एक मोठा पराक्रम केला. त्याला ‘चेग डॉट ऑर्ग ग्लोबल स्टुडंट प्राईज’ मिळाला. हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला. या पुरस्कारासोबत त्याला 1 लाख डॉलरची रक्कमही मिळाली. सध्या आदर्श कतारमधील जॉर्जटाऊन विद्यापीठात शिक्षण घेतोय.

विचार करा… ज्या मुलाकडे एकेकाळी कोचिंगची फी भरण्यासाठी पैसे नव्हते, तो आज 25 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी संधींचे दरवाजे उघडतोय. IIT मध्ये शिकण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही, पण त्या अपूर्ण स्वप्नातून त्याने हजारो मुलांच्या स्वप्नांना नवी दिशा दिली. म्हणूनच आदर्श कुमारची ही गोष्ट केवळ एका पुरस्काराची नाही, तर अडचणींना संधीमध्ये बदलणाऱ्या जिद्दीची आहे!

Exit mobile version