Amit Shah : गेल्या 35 वर्षांपासून दहशतवादाचा सामना करणाऱ्या भारतासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलाय. लष्कर-ए-तोयबाचा (LeT) दहशतवादी लतीफ भट याचा खात्मा झाल्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये (Kashmir) भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक नसल्याचे यांनी म्हटले आहे. गुरुवारी आयोजित दोन दिवसीय दहशतवादविरोधी परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते.
अमित शाह म्हणाले की, भारत दीर्घकाळापासून दहशतवादाचा बळी ठरला आहे. मात्र, आता देशभरात दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी एकसमान आणि प्रभावी रणनीती राबवली जात आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून कामाख्यापर्यंत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर दहशतवादविरोधी यंत्रणा अधिक सक्षम केली जात आहे.
दहशतवादाच्या आर्थिक नेटवर्कवरही प्रहार करण्याची गरज
दहशतवाद संपवण्यासाठी केवळ दहशतवाद्यांवर कारवाई करून चालणार नाही, तर त्यांच्या संपूर्ण आर्थिक नेटवर्कला लक्ष्य करणे आवश्यक असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले. यासाठी आर्थिक तपास यंत्रणा आणि इतर सुरक्षा संस्थांमध्ये अधिक चांगला समन्वय असायला हवा, असेही ते म्हणाले. शहजाद भट्टी नेटवर्कला बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले आहे. या नेटवर्कशी संबंधित देशभरातील 40 हून अधिक मॉड्यूल निष्क्रिय करण्यात आले आहेत. तसेच या कारवाईत 100 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले असून 271 पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
36 देशांतून 303 फरार आरोपी भारतात परत
2019 पासून फरार आरोपींना परदेशातून भारतात आणण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 36 देशांतून 303 फरार आरोपींना भारतात आणण्यात यश आल्याचे अमित शाह यांनी सांगितले. यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI), केंद्रीय गृह मंत्रालय आणि गुप्तचर यंत्रणांनी विशेष प्रयत्न केले. वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून परदेशात लपलेल्या आरोपींना भारतात आणण्याचे काम करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
PFI नेटवर्क एकाच रात्रीत उद्ध्वस्त
सप्टेंबर 2022 मध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी देशातील 11 राज्यांमध्ये एकाच रात्री समन्वयाने कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत संपूर्ण नेटवर्कचा कणा मोडण्यात यश आल्याचे शाह यांनी सांगितले.
दहशतवाद, संघटित गुन्हेगारी आणि अमली पदार्थांची तस्करी या तीन समस्या पूर्णपणे संपवायच्या असतील, तर परदेशात आश्रय घेतलेल्या गुन्हेगारांना आणि त्यांच्या सूत्रधारांना भारतीय न्यायालयांसमोर आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
