Download App

दिल्ली गमावली, ‘आप’चा राष्ट्रीय दर्जा जाणार? पूर्ण गणित समजून घ्याच!

दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय दर्जा राहणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Delhi Elections 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला जोरदार (Delhi Elections 2025) झटका बसला. भाजपने आपला सत्तेतून बेदखल करत 27 वर्षानंतर दिल्लीच्या सत्तेत वापसी केली. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला फक्त 22 आमदार निवडून आणता आले. भाजपने 48 जागा जिंकत बहुमत मिळवले. या पराभवानंतर आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय दर्जा राहणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

निवडणूक आयोगाने (Election Commission) एप्रिल 2023 मध्ये आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला. याच वेळी तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट या तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला. चला तर मग या निमित्ताने जाणून घेऊ की राष्ट्रीय पार्टीचा दर्जा काय असतो आणि आम् आदमी पार्टीचा हा दर्जा केव्हा काढून घेतला जाऊ शकतो..

राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय

भारतात सध्या सहा राष्ट्रीय पक्ष आहेत. भाजप, आम आदमी पार्टी, काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी – मार्क्सवादी आणि नॅशनल पीपल्स पार्टी या सहा पक्षांचा समावेश आहे. राष्ट्रीय पक्षांचा प्रभाव फक्त एका राज्यापुरता नसतो. या पक्षांकडून अनेक राज्यांत निवडणुका लढल्या जातात. याउलट काही पक्ष फक्त एखाद्या राज्यातच राहतात. महाराष्ट्रात शिवसेना, तामिळनाडूतील द्रमुक आणि अण्णाद्रमुक, ओडिशामधील बिजू जनता दल, बिहारमधील राष्ट्रीय जनता दल हे पक्ष त्यांच्या राज्यापुरतेच मर्यादित आहेत.

राष्ट्रीय पक्षाची मान्यता कशी ठरते

निवडणूक आयोगानुसार भारतीय राजकीय पक्षांना तीन श्रेणीत विभागले जाते. यामध्ये राष्ट्रीय पार्टी, राज्य पार्टी, आणि रजिस्टर्ड पार्टी या तीन श्रेणी आहेत. राष्ट्रीय पार्टीचा दर्जा मिळण्यासाठी कमीत कमी चार राज्यांत त्या पक्षाला राज्य पार्टीचा दर्जा प्राप्त असावा. लोकसभेतील एकूण जागांच्या 2 टक्के जागा जिंकलेल्या असाव्यात तसेच या जागा कमीत कमी तीन वेगवेगळ्या राज्यांतील असाव्यात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकूण वैध मतांच्या 6 टक्के मते मिळालेली असावीत आणि चार लोकसभा जागा जिंकलेल्या असाव्यात.

केजरीवालांचा पाय खोलात! शीशमहलची तपासणी होणार; CVC चा आदेश धडकला

राष्ट्रीय पार्टीचा दर्जा का आवश्यक

एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यास अनेक फायदे मिळतात.

संपूर्ण देशात एक निश्चित निवडणूक चिन्ह मिळते.
उमेदवारी अर्ज भरताना फक्त एकच प्रस्तावकाची गरज असते
निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या दोन वेळेस मोफत मिळतात
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 40 स्टार प्रचारक नियुक्त केले जाऊ शकतात.
सामान्य राजिस्टर्ड पक्षासाठी ही संख्या 20 इतकी मर्यादित आहे.
दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर मोफत प्रसारणाचा अधिकार मिळतो.
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षास सरकारी बंगला आणि दिल्लीत कार्यालय उपलब्ध करून दिले जाते.

‘आप’ कसा बनला राष्ट्रीय पक्ष

निवडणूक आयोगाच्या या सगळ्या अटी हळूहळू आम आदमी पार्टीने पूर्ण केल्या. सन 2013 आणि 2015 मध्ये दिल्लीत पक्षाची सत्ता आली. यानंतर सन 2022 मध्ये पंजाब राज्यातही आम् आदमी पार्टीने सरकार स्थापन केले. 2022 मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाला एकूण 6.77 टक्के मते मिळाली. तर गुजरात विधानसभा निवडणुकीत 13 टक्के मते मिळाली. यानंतर चार राज्यांत राज्य पार्टीचा दर्जा मिळाल्याने सन 2023 मध्ये आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पार्टी म्हणून घोषित करण्यात आले.

आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय दर्जा संपणार?

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाला आहे. तरीही आप राष्ट्रीय पक्ष म्हणून कायम राहणार आहे. पक्षाला या निवडणुकीत जवळपास 43 टक्के मते मिळाली आहेत. तसेच पक्षाने 22 जागा जिंकल्या आहेत. राज्य पार्टीचा दर्जा टिकवण्यासाठी फक्त 2 जागांची आवश्यकता होती. यापेक्षा आपला मिळालेल्या जागा कितीतरी जास्त आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) पक्षाला 3 जागा मिळाल्या आहेत. पंजाब, गोवा, गुजरात राज्यातील पक्षाची कामगिरी आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पार्टी म्हणवण्यास पुरेशी आहे.

दिल्लीचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स कायम, ‘या’ दिवशी होणार शपथविधी

राष्ट्रीय दर्जा संपल्यावर काय होतं

पक्षाचे निवडणूक चिन्ह पहिल्या क्रमांकावर दिसणार नाही
निवडणूक आयोगाच्या सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण मिळणार नाही
प्रचार आणि निवडणूक फंडींगवर परिणाम होईल
पक्षाच्या स्टार प्रचारकांची संख्या 40 वरून 20 वर येईल

पक्षांचा राष्ट्रीय दर्जा कसा समाप्त होतो

तृणमूल काँग्रेसला सन 2016 मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. परंतु पूर्वोत्तर राज्यांत खराब कामगिरीमुळे 2023 मध्ये पक्षाचा राष्ट्रीय दर्जा संपुष्टात आला. सन 2000 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (Nationalist Congress Party) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. परंतु अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि मेघालय राज्यात खराब कामगिरीमुळे याही पक्षाचा राष्ट्रीय दर्जा संपुष्टात आला.

सीपीआय पक्षाला सन 1989 मध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतु पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांत खराब कामगिरीमुळे या पक्षाला राष्ट्रीय दर्जा गमवावा लागला. आता आगामी काळात पंजाब, गुजरात आणि गोवा राज्यात पक्षाची कामगिरी खराब राहिली तर राष्ट्रीय दर्जा धोक्यात येऊ शकतो. आता आम आदमी पार्टीला दिल्लीत पराभव स्वीकारावा लागला असला तरी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा सध्या सुरक्षित आहे. याचा आढावा निवडणूक आयोगाकडून सातत्याने घेतला जात असतो.

follow us