नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीत तेलंगणाचा अपवाद वगळता अन्य चार राज्यांत काँग्रेसने (Election Results 2023) सपाटून मार खाल्ला. राजस्थान आणि छत्तीसगडसारखी मोठी राज्ये काँग्रेसने अनपेक्षितरित्या गमावली. मध्य प्रदेशातही वाईट अवस्था झाली. विधानसभा निवडणुकीत इतकं मोठं अपयश का आलं याचं चिंतन सुरू असतानाच काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीलाही (INDIA Alliance Meeting) दणके बसू लागले आहेत. उद्या (6 डिसेंबर) काँग्रेसच्या (Congress) वतीने आयोजित करण्यात आलेली ‘इंडिया’ (India) आघाडी बैठक रद्द करण्यात आली आहे. (After the defeat in three states, Congress lost weight in the ‘India’ alliance)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि अन्य बड्या नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली होती. यातील अखिलेश यादव आणि एम. के. स्टॅलिन हे काँग्रेसवर नाराज असल्याची माहिती आहे. यादव यांनी तर आता लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत राहायचे की नाही याचा विचार करावा लागेल, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळेच तीन राज्यांतील निकालानंतर इंडिया आघाडीला घरघर तर लागलीच आहे, पण काँग्रेसचेही वजन घटल्याची चर्चा आहे.
दरम्यान, काँग्रेसवर ओढावलेली ही नामुष्की मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्यामुळे ओढावल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणुकांच्या निकालात भाजपने मध्यप्रदेशमध्ये मोठा विजय मिळवत काँग्रेसला पाणी पाजले. तब्बल 163 जागांवर भाजपने विजय मिळविला. पण इंडिया आघाडीचा भाग असूनही मध्य प्रदेशात समाजवादी पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. पक्षाने सुमारे 70 जागांवर उमेदवार उभे केले होते. सुरुवातीला यादव यांनी काँग्रेसकडे काही जागांची मागणी केली होती.
मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाने आत्मविश्वास वाढल्याने काँग्रेसने आणि त्यातही कमलनाथ यांनी सपासोबत युती करण्यास नकार दिला होता. याबाबत अखिलेश यांनी नाराजी व्यक्त करत आता लोकसभा निवडणुकीत एकत्र राहायचे की नाही याचा विचार करणार असल्याचे सांगितले होते. आता निकालानंतर मध्यप्रदेश विधानसभेत अनेक जागांवर अखिलेश यादव यांच्या पक्षाने काँग्रेसचे मोठे नुकसान केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची युती झाली असती तर काहीसा निकाल बदलू शकला असता.
एम. के. स्टॅलिन यांचा ‘द्रमुक’ हा देखील विरोधी इंडिया आघाडीचा भाग आहे. निवडणुकीपूर्वी भोपाळमध्ये इंडिया आघाडीची बैठक आणि एकत्रित सभा होणार होती. मात्र त्यापूर्वीच एम. के. स्टॅनिल यांचे सुपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माचे वर्णन डेंग्यू-मलेरिया असे केले. यावरुन मोठा वाद उभा राहिला. काँग्रेसही सनातनकडे त्याच मानसिकतेने पाहते, असे वातावरण भाजपच्या बाजूने निर्माण होऊ लागले, त्यामुळे काँग्रेसने आणि त्यातही कमलनाथ यांनी या वादापासून स्वतःला लांब ठेवण्यास सुरुवात केली.
कमलनाथ यांनी अनेकवेळा स्वतःला सनातनी आणि हनुमानाचा भक्त असल्याचे सांगितले होते. अनेक धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. आता भारत आघाडीच्या रॅलीमुळे या सर्व मेहनतीला फटका बसणार असा अंदाज त्यांनी लावला आणि थेट बैठकच रद्द झाल्याची घोषणा झाली. यानंतर स्टॅलिन हेही काँग्रेसवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. याच सर्वांमुळे आता इंडिया आघाडीत दोन पक्ष नाराज आहेत. शिवाय तीन राज्यांतील पराभावामुळे काँग्रेसचेही वजन घटले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नितीश कुमार यांना आघाडीचा चेहरा म्हणून घोषित करावे अशी मागणी होत आहे.