नवी दिल्ली : बिहारमध्ये नितीश कुमार भाजपसोबत जाणार असल्याच्या वृत्ताने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला असतानाच उत्तर प्रदेशमध्ये मात्र आघाडीसाठी गुड न्यूज आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष (Samajwadi Party) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षातील जागा वाटपाचे गणित ठरले आहे. या गणितानुसार समादवादी पक्षाने काँग्रेसला 11 जागा दिल्या आहेत. याबाबत स्वतः माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी समाजमाध्यमावरुन घोषणा केली.
अखिलेश यादव म्हणाले, 11 मजबूत जागांसह काँग्रेससोबतच्या आमच्या मैत्रीची चांगली सुरुवात झाली आहे. ही सुरुवात विजयी समीकरणासह पुढे जाईल. ‘इंडिया’ची टीम आणि ‘पीडीए’ची रणनीती इतिहास बदलेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Alliance with Congress on 11 seats in Uttar Pradesh, ” tweets Samajwadi Party chief Akhilesh Yadav)
"Alliance with Congress on 11 seats in Uttar Pradesh, " tweets Samajwadi Party chief Akhilesh Yadav pic.twitter.com/m9utr4kmwR
— ANI (@ANI) January 27, 2024
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत, समाजवादी पक्षाने यापूर्वीच 80 पैकी आपण 65 जागा लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. तर काँग्रेस आणि जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोक दलाला 15 जागा देऊ असे सांगितले होते. त्यानंतरही काँग्रेससोबतची चर्चा पुढे जात नसल्याने समजावादी पक्षाने राष्ट्रीय लोक दलसोबतची चर्चा पुढे सरकवली. यात जयंत चौधरी यांना सात जागा देऊ केल्या होत्या. त्यामुळे काँग्रेससाठी केवळ आठ जागा शिल्लक राहिल्या होत्या.
त्यानंतर आता काँग्रेसला 11 जागा देण्याबाबत अंतिम निर्णय झाला आहे, असे अखिलेश यादव यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष 62, काँग्रेस अकरा आणि राष्ट्रीय लोक दल सात जागांवर निवडणूक लढविणार आहे. दुसऱ्या बाजूला बहुजन समाज पक्ष सर्व 80 जागांवर निवडणूक लढविणार असल्याची माहिती आहे. तिसऱ्या बाजूला भाजप 78 आणि अपना दल दोन जागांवर निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये सर्वच जागांवर तिरंगी लढत दिसणार आहे.