आंदोलनातील विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जचा हिशेब द्या; राहुल गांधींचा अमित शाहांवर थेट निशाणा

आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार आणि पोलिसांच्या कारवाईवर संसदेत चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले होते.

News Photo   2026 08 10T192533.677

आंदोलनातील विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जचा हिशेब द्या; राहुल गांधींचा अमित शाहांवर थेट निशाणा

झारखंडमध्ये JPSC आणि JSSC स्पर्धा (Rahul Gandhi) परीक्षांमधील कथित पेपरफुटी, गैरप्रकार, अनियमितता आणि निवड प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करावी, तसेच या प्रकरणांची CBI चौकशी करावी, या मागण्यांसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या बळाच्या वापरावरून आता राजकीय वातावरण तापले असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

इंदिरा भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवर करण्यात आलेली पोलिसांची कारवाई चुकीची असल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांना शांततापूर्ण पद्धतीने आपले म्हणणे मांडण्याचा आणि आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्यांच्या मागण्यांकडे बळाचा वापर करून नव्हे, तर चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून पाहिले पाहिजे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. झारखंड सरकारने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

लोकसभेत राहुल गांधींचा गंभीर आरोप; शिक्षण मंत्रालय नाही, RSS चालवतंय देशाची शिक्षण व्यवस्था

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या संसदेत बोलणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी थेट त्यांनाच लक्ष्य केले. ‘विरोधकांना गृहमंत्र्यांचे कोणतेही सामान्य भाषण ऐकण्यात रस नाही. 20 जुलै रोजी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, खिळे लावलेल्या काठ्या आणि पेलेट गनचा वापर करण्याचे आदेश नेमके कोणी दिले, हे अमित शाह यांनी स्पष्ट करावे,’ अशी मागणी त्यांनी केली. हे आदेश अमित शाह यांनी दिले असतील तर ते दोषी आहेत आणि त्यांना याची माहितीच नसेल तर ते अक्षम आहेत; त्यामुळे दोन्ही परिस्थितींमध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असा थेट इशाराच राहुल गांधी यांनी दिला.

विशेष म्हणजे, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सरकार विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार आणि पोलिसांच्या कारवाईवर संसदेत चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. तसेच या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शाह सभागृहात भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर काही तासांतच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला पुन्हा एकदा घेरले आहे. त्यामुळे उद्या संसदेत अमित शाह काय भूमिका मांडतात आणि राहुल गांधींच्या आरोपांना काय उत्तर देतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version