Download App

तिरुपती मंदिरातील ‘लाडू’त जनावरांची चरबी? CM नायडूंचा माजी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

Chandrababu Naidu : आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी (Chandrababu Naidu) नुकताच एक धक्कादायक दावा केला आहे. ज्यामुळे देशभरातील हिंदू धर्मियांत संतापाची लाट उसळली आहे. आधीच्या वायएसआर काँग्रेस (Andhra Pradesh) सरकारच्या काळात तिरुपती मंदिरातील लाडूचा प्रसाद (Tirumala Temple) तयार करताना त्यात जनावरांची चरबी वापरली जात होती, असा दावा नायडू यांनी केला आहे. नायडूंच्या या आरोपांवर वायएसआर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली असून आरोप फेटाळून लावले आहेत.

नायडू म्हणाले, मागील वायएसआर काँग्रेस सरकारने तिरुपती मंदिरात येणाऱ्या भाविकांना देण्यात येणाऱ्या लाडूच्या प्रसादात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले. तसेच हा प्रसाद तयार करण्यासाठी जनावरांच्या चरबीची वापर करण्यात आला होता. राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री नायडू यांनी हा मुद्दा उपस्थित केला. वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात जगन मोहन रेड्डी राज्याचे (Jagan Mohan Reddy) मुख्यमंत्री होते.

Chandrababu Naidu : माजी मुख्यमंत्र्यांकडे 810 कोटींची संपत्ती, गेल्या पाच वर्षात 41 टक्क्यांनी वाढ

मागील पाच वर्षांच्या काळात वायएसआर काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी तिरुमला मंदिराचे पावित्र्य नष्ट करण्याचं काम केलं. अन्नदानमच्या गुणवत्तेशी तडजोड केली. तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर करून पवित्र अशा तिरुमला लाडूलाही दूषित केले. या प्रकाराने चिंतेचं वातावरण तयार झालं आहे. परंतु, आम्ही यामध्ये तत्काळ सुधारणा केली असून आता प्रसाद तयार करण्यासाठी शुद्ध तूप वापरण्यात येत असल्याचे चंद्राबाबू नायडू यांनी स्पष्ट केले.

वायएसआर काँग्रेसचा पलटवार

या आरोपांवर वायएसआर काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभा खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी म्हणाले, नायडू स्वतःच तिरुमला मंदिराच्या पावित्र्य कमी करण्याचं काम करत आहेत. तिरुमला मंदिराचं पावित्र्य आणि कोट्यावधी हिंदूंच्या आस्था त्यांनी दुखावल्या आहेत. तिरुमला प्रसादाच्या बाबतीत नायडूंनी जे आरोप केले आहेत ते अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहेत. राजकीय स्वार्थासाठी नायडू कोणतीही पातळी गाठू शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मी माझ्या परिवारासह देवासमोर शपथ घेण्यास तयार आहे पण नायडू देखील शपथ घेण्यास तयार आहेत का, असा सवाल रेड्डी यांनी उपस्थित केला.

Sonu Sood: आंध्रप्रदेश- तेलंगणात मुसळधार पावसाने पुराचा हाहाकार, सोनू सूदचा मदतीचा हात

दरम्यान, मुख्यमंत्री चंद्राबाबू यांच्या आरोपांनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. देश विदेशातू दररोज लाखो भाविक तिरुपती मंदिरात येतात. दर्शन घेतल्यानंतर त्यांना लाडूचा प्रसाद दिला जातो. परंतु, या प्रसादात जनावरांची चरबी मिसळली जात होती असा दावा नायडूंनी केला आहे. आधीच्या सरकारच्या काळात असे प्रकार घडत होते असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकाराने हिंदू धर्मियांत संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. आता नायडूंच्या नेतृत्वातील सरकार चौकशी करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us