राम मंदिरातील देणगी अपहारप्रकरणी तपासाला वेग; चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचा तात्काळ राजीनामा

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे

Untitled Design (32)

Untitled Design (32)

Anil Mishra’s immediate resignation : अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित एक मोठी घडामोड समोर आली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती विभागाने या राजीनाम्याची माहिती दिली आहे. त्याचवेळी राम मंदिरातील देणग्या आणि भाविकांच्या अर्पणाच्या रकमेच्या कथित अपहारप्रकारणी मोठी कारवाई करण्यात आली असून, एफआयआरमध्ये नाव असलेल्या आठही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणाची सुरूवात श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य श्रीकृष्ण मोहन यांनी केलेल्या तक्रारींपासून झाली. मंदिरातील देणग्या, अर्पण आणि इतर आर्थिक व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी पोलिसांकडे औपचारीक तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तापास सुरू केला.

तपासादरम्यान अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेश पांडे, रामशंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव आणि रामशंकर यादव उर्फ टिन्नू या आठ जणांची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तपासातून आणखी काही आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्ती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बीडमध्ये विलास घुले प्रकरणावरून राजकारण; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचं मात्र मौन

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीकडे पाहिल्यास, अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून आणि परदेशातून देखील मोठ्या प्रमाणात देणग्या जमा झाल्या होत्या. मंदिराच्या भूमिपूजनापासून ते प्राणप्रतिष्ठेपर्यंत लाखो-कोट्यवधी भाविकांनी आर्थिक योगदान दिले. मंदिर सुरू झाल्यानंतर देखील दररोज मोठ्या प्रमाणात देणग्या आणि अर्पण जमा होत आहेत. त्यामुळे या निधीच्या व्यवस्थापनाबाबत पारदर्शकता आणि विश्वास टिकवणे ट्रस्टसाठी अत्यंत महत्वाचे मानले जात होते.

यापूर्वी देखील राम मंदिर ट्रस्टच्या जमिनीच्या खरेदीसंदर्भात विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र ट्रस्टने ते सर्व आरोप फेटाळून लावत सर्व व्यवहार नियमानुसार झाल्याचा दावा केला होता. आता मात्र देणग्यांच्या कथित अपहारप्रकरणी थेट एफआयआर नोंद होणे, त्यानंतर आठ जणांना अटक होणे आणि त्याच दिवशी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय तसेच विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामा देणे, या घडामोडींमुळे या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.

Ketan Agarwal Case : केतन केसांचा विग घालत होता? वडिलांनी सर्वकाही सांगितलं

सध्या पोलिस आणि संबंधित तपास यंत्रणा आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, देणगी व्यवस्थापनाची प्रक्रिया आणि निधीचा वापर यांची सखोल तपासणी करत आहेत. या तपासातून नेमका किती निधीचा अपहार झाला, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि ट्रस्टच्या व्यवस्थापनातील इतर कोणाची भूमिका होती का, याबाबत पुढील काही दिवसांत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

अयोध्येतील राम मंदिर हे देशातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे तपासाचा अंतिम निष्कर्ष आणि त्यानंतर होणारी कारवाई याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version