Arjun Modhwadia : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) काँग्रेस पक्षाला एकामागून एक धक्के बसत आहेत. आता गुजरातमधील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या अर्जुन मोढवाडिया (Arjun Modhwadia) यांनी गुजरात विधानसभेचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा गुजरात विधानसभेचे अध्यक्ष शंकरभाई चौधरी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
अर्जुन मोढवाडिया यांनी पक्ष सोडणे हा गुजरात काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. अर्जुन मोढवाडिया हे ओबीसी समाजाचे आहेत. त्यांचा सौराष्ट्रातील किनारपट्टी भागात मोठा प्रभाव आहे. त्यांनी गुजरात विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदही भूषवले आहे आणि राज्यात काँग्रेस पक्षाचे नेतृत्वही केले आहे. कधीकाळी गुजरातमध्ये त्यांची गणना अहमद पटेल यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर केली जात होती. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अर्जुन मोढवाडिया हे गुजरात काँग्रेस पक्षाचा चेहरा होते.
…तर आपणाला कधीच माफ करणार नाही, आव्हाडांचे प्रकाश आंबेडकरांना खुलं पत्र
गुजरात काँग्रेसमध्ये अर्जुन मोढवाडिया अहमद पटेल यांच्या जवळचे मानले जात होते. सध्या गुजरात काँग्रेसमधील शक्तीसिंग गोहिल आणि भरतसिंग सोलंकी यांच्यासारख्या बड्या नेत्यांनाही अर्जुन मोढवाडिया यांनी पक्ष सोडल्याने धक्का बसला आहे.
अर्जुन मोढवाडिया आगामी काळात भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा आहे. पोटनिवडणुकीत त्यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. याशिवाय अर्जुन मोढवाडिया आमदार झाल्यानंतर भाजप त्यांना महत्त्वाची जबाबदारी देऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
जरांगे यांच्या चौकशीसाठी SIT : फडणवीस 2019 ची चूक पुन्हा करतायेत?
केसी वेणगोपाल यांनी गुजरातबाबत घेतलेल्या निर्णयांवर अर्जुन मोढवाडिया खूश नव्हते. एवढेच नाही तर गुजरात विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची निवड करताना त्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याचेही समोर आले होते. भरतसिंग सोलंकी यांच्यानंतर अमित चावडा यांना गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यास ते सहमत नव्हते, असेही म्हटले जात आहे.