Download App

Arjun Munda : मोदी सरकारचा मोठा निर्णय! तोमर यांचा राजीनामा, अर्जुन मुंडा नवे कृषिमंत्री

Arjun Munda new Agricultural Minister : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत (MP Election 2023) केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र सिंह तोमर यांना तिकीट मिळाले होते. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. त्यामुळे आता नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी कृषीमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा स्वीकारला आहे. तोमर यांच्या जागी आता कॅबिनेट मंत्री अर्जुन मुंडा (Arjun Munda) यांना देशाचे कृषिमंत्री करण्यात आले आहे. नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह प्रल्हाद सिंह पटेल आणि रेणुका सिंह यांचेही राजीनामे राष्ट्रपतींनी स्वीकारले आहेत.

मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील दिमानी मतदारसंघातून तोमर यांना भाजपने उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात तोमर यांनी बसपा उमेदवार बलवीर सिंह दंडौतिया यांचा पराभव केला. याआधी तोमर मुरैना लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या खासदारकीचाही राजीनामा दिला आहे. तसेच कृषिमंत्रीपदी सोडले आहे. त्यांच्या जागी मोदी सरकारने केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांना कृषिमंत्री केले आहे.

तोमर यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल, छत्तीसगडच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री रेणुका सिंह तसेच राजस्थानमधील खासदार बाबा बालकनाथ यांनाही राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण या खासदारांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. यामुळे केंद्रातील तीन मंत्रिपदे रिक्त होणार आहेत. एका जागी अर्जुन मुंडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणखी दोन मंत्रिपदे कुणाच्या वाट्याला जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मध्य प्रदेशात हायकमांड अ‍ॅक्शन मोडवर, कमलनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी

केंद्र सरकारची मोठी खांदेपालट 

केंद्र सरकारने राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे जलशक्ती मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे आदिवासी व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

Tags

follow us