सिलचर : आसाममधील भाजपचे खासदार राजदीप रॉय यांच्या निवासस्थानी एका 10 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एका बंद खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी सिलचर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलला (एसएमसीएच) पाठवला. (A 10-year-old boy’s body was found at the residence of BJP MP Rajdeep Roy in Assam)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलाची आई खासदार रॉय यांच्या घरी काही वर्षांपासून मदतनीस म्हणून काम करत होत्या. त्या कचार जिल्ह्यातील पलोंग घाट भागातील रहिवासी असल्याने रोज जाणे-येणे करणे शक्य नसल्याने आपल्या मुलाला आणि मुलीला घेऊन त्या खासदार रॉय यांच्या घरीच राहत होत्या. संबंधित मुलगा पाचवीत शिकत होता.
प्रथमदर्शनी कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओ गेम खेळण्यासाठी मोबाईल फोन न मिळाल्याने तो त्याच्या आईवर रागावला होता. त्यानंतर आई मुलीसोबत काही किराणा सामान घेण्यासाठी गेली होती ती जवळपास 40 मिनिटे बाहेर होती. जेव्हा ती परत आली तेव्हा तिला खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळला, त्यामुळे हे आत्महत्येचे प्रकरण असावे असा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला.
मुलाचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच खासदार रॉय यांनी घरी धाव घेतली. रॉय यांच्या म्हणण्यानुसार हा मुलगा हुशार विद्यार्थी होता. “मी त्याचे हस्ताक्षर पाहिले आणि त्याच्याशी काही वेळा संवाद साधला. त्याला चांगले ज्ञान होते… या मृत्यूमुळे माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे आणि माझ्या कुटुंबाला धक्का बसला आहे.
दरम्यान, सर्व गोष्टींची कसून तपासणी केली जात असून, प्रत्येकजण आम्हाला सहकार्य करत आहे. सध्य पुढील तपास सुरू आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.