Download App

Ayodhya : राम वाद नव्हे तर, समाधान आहे! फक्त विचार बदलण्याची गरज : PM मोदी

अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना महापूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. तब्बल पाच शतकांचा वनवास संपवून श्रीराम पुन्हा मंदिरात विराजमान झाल्याने संपूर्ण देशात भक्तीमय आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. Ayodhya Ram Mandir Inauguration Update

LIVE NEWS & UPDATES

  • 22 Jan 2024 02:41 PM (IST)

    ही फक्त विजयाची नाही तर नम्रतेची देखील संधी आहे : पंतप्रधान मोदी

    पंतप्रधान म्हणाले की, आजचा हा प्रसंग केवळ उत्सवच नाही तर भारतीय समाजाच्या परिपक्वतेची जाणीव करून देणारा आहे. ही केवळ विजयाची नाही तर नम्र होण्याचीही संधी आहे. आपले भविष्य सुंदर होणार आहे. एक काळ होता जेव्हा लोक म्हणायचे की राम मंदिर बांधले तर आग लागेल. अशा लोकांना भारत ओळखता आला नाही. यांना भारताच्या सामाजिक जाणीवेची पवित्रता माहिती नव्हती. प्रभू श्रीराम मंदिराचे बांधकाम भारतीय समाजाच्या शांततेचे आणि समन्वयाचे प्रतीक आहे. हे बांधकाम कोणत्याही आगीला नाही तर ऊर्जेला जन्म देत आहे. राम अग्नी नसून ऊर्जा आहे. राम केवळ वर्तमान नसून शाश्वत आहे. राम ही समस्या नाही, तो उपाय आहे. राम वाद नव्हे तर, समाधान आहे. फक्त विचार बदलण्याची गरज आहे.

  • 22 Jan 2024 02:33 PM (IST)

    न्यायाची प्रतिष्ठा जपल्याबद्दल भारतीय न्यायव्यवस्थेचे आभार : पंतप्रधान मोदी

    प्रभू श्रीरामासाठी कायदेशीर लढाई करावी लागली. पण न्यायाची प्रतिष्ठा जपल्याबद्दल मी भारतीय न्यायव्यवस्थेचे आभार मानतो. याच न्यायाने राम मंदिर बांधले गेले.

  • 22 Jan 2024 02:33 PM (IST)

    आज संपूर्ण देश दिवाळी साजरी करत आहे: पंतप्रधान मोदी

    पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज प्रत्येक गावात एकाच वेळी कीर्तन-संकीर्तन होत आहे. आज अनेक मंदिरांमध्ये उत्सवाचे आयोजन केले जात आहे, स्वच्छता अभियान राबवले जात आहे. संपूर्ण देश आज दिवाळी साजरी करत आहे. आज संध्याकाळी घरोघरी रामज्योतीची जय्यत तयारी सुरू आहे.

  • 22 Jan 2024 02:29 PM (IST)

    हजार वर्षांनंतरही या तारखेची चर्चा होईलः पंतप्रधान मोदी

    अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजपासून हजार वर्षांनंतरही लोक या तारखेबद्दल, या क्षणाबद्दल बोलतील. हा रामाचा खूप मोठा आशीर्वाद आहे की आपण सर्वजण हा क्षण जगत आहोत आणि प्रत्यक्षात घडताना पाहत आहोत.

  • 22 Jan 2024 02:22 PM (IST)

    आता आमचा राम तंबूत नाही तर भव्य मंदिरात विराजमान आहे : पंतप्रधान मोदी

    रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, शतकानुशतकांच्या तपश्चर्येनंतर, संयम, त्यागानंतर आज आपला राम परत आला आहे. आपले प्रभू श्रीराम परत आले आहेत. 22 जानेवारी ही केवळ कॅलेंडरवर लिहिलेली तारीख नाही तर, आजचा दिवस हा नव्या कालचक्राचा उगम आहे. आमचा रामलला आता तंबूत राहणार नाही, तर आता दिव्य मंदिरात विराजमान झाला आहे. हा क्षण सर्वात पवित्र आहे. हा क्षण अलौकिक आहे. ही ऊर्जा आणि वेळ आपल्या सर्वांवर प्रभू श्री रामाचा आशीर्वाद आहे.

    मी नुकताच तुम्हा सर्वांसमोर गर्भगृहातून चैतन्याचा साक्षीदार म्हणून तुमच्यासमोर आलो आहे. तुम्हाला सांगण्यासारखं खूप काही आहे पण माझा कंठ दाटून आला आहे. मी प्रभू श्री रामाची माफीही मागतो. आपल्या प्रयत्नांमध्ये, आपल्या त्याग आणि तपश्चर्येमध्ये काहीतरी कमतरता असावी की आपण हे काम इतक्या शतकांपासून करू शकलो नाही, अशी खंत व्यक्त करत आज ती उणीव पूर्ण झाली आहे आणि मला विश्वास आहे की प्रभू श्री राम आपल्या सर्वांना माफ करतील, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

     

  • 22 Jan 2024 02:17 PM (IST)

    पंतप्रधान मोदी हे तपस्वी आहेत : मोहन भागवत

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, आजचा आनंद शब्दात वर्णन करता येणारा नाही. आज भारताची शान रामललासोबत परतली आहे. आज आपण ऐकले की, प्राणप्रतिष्ठा महोत्सवाला उपस्थित राहण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी कडक उपवास केला. माझी त्यांच्याशी जुनी ओळख आहे. ते तपस्वी आहेत. पण ते एकटेच तपश्चर्या करतात, आपण काय करायचं? रामलला अयोध्येत आला, तो अयोध्येबाहेर का गेला? रामायणात का निघाला? त्यावेळी वाद झाला होता. तो 14 वर्षे वनवासात गेला. संसारातील कलह संपवून तो परत आला. आज 500 वर्षांनी रामलला पुन्हा आले आहेत.

  • 22 Jan 2024 02:15 PM (IST)

    मी भावूक आहे, संपूर्ण देश राममय झाला आहे : मुख्यमंत्री योगी

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, रामोत्सवाच्या या शुभ मुहूर्तावर मी सर्वांच्या वतीने पंतप्रधान मोदींचे स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. मला माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नाहीत. माझे हृदय भावनिक आहे. आज या ऐतिहासिक आणि पवित्र प्रसंगी भारतातील प्रत्येक शहर आणि गाव अयोध्याधाम आहे आणि प्रत्येक रस्ता अयोध्या जन्मभूमीकडे येत आहे. प्रत्येक डोळा समाधानाच्या अश्रूंनी ओलावला आहे. संपूर्ण देश राममय झाला आहे. आपण त्रेतायुगात प्रवेश केल्याचे दिसते. आज रघुनंदन, राघव आणि रामलला त्याच्या सिंहासनावर विराजमान झाला आहे.

  • 22 Jan 2024 02:12 PM (IST)

    चरणामृत सेवन करून मोदींनी सोडला उपवास

    राम मंदिर सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींनी चरणामृत सेवन करून 11 दिवसांचे उपोषण पूर्ण केले. गोविंद देव गिरी महाराज यांनी पंतप्रधान मोदींना चरणामृत पाजले आणि 11 दिवसांचे उपवास सोडवला.

  • 22 Jan 2024 02:11 PM (IST)

    गोविंददेव गिरी यांनी पंतप्रधान मोदींना दिली राजर्षी उपाधी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळेच अयोध्येत आजचा सोहळा पार पडला आहे. मोदींनी रामलल्लांसाठी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी संपूर्ण नियमांचे पालन केले. हे कुणी सर्वसाधारण व्यक्ती करू शकत नाही. त्यांचे हे कार्य बघून गोविंददेव गिरी यांनी मोदींना राजर्षी ही उपाधी दिली.

  • 22 Jan 2024 12:42 PM (IST)

    आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली ! जय श्रीराम !

    मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर अवघ्या एका ओळीचे समर्पक ट्विट करत आजच्या दिवसाचे वर्णन केले. आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली ! जय श्रीराम ! असे ते म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज