Bankipur by election Prashant Kishor leads BJP’s stronghold in crumbled : बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया 30 जुलै रोजी पार पडली असून आज 3 ऑगस्ट रोजी मतमोजणी होत आहे. याठिकाणी 31 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. आतापर्यंत 18 फेऱ्या झाल्या असून त्यात प्रशांत किशोर हे तब्बल 10 हजार 436 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे किशोर याच्या विजयाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.
या पार्श्वभूमीवर ‘रुद्र रिसर्च अँड अॅनालिटिक्स, पुणे’ या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार बिहारच्या बांकीपूर मतदारसंघात जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्या विजयाची शक्यता वर्तविण्यात आली होती. हा अंदाज आता खरा होण्याच्या जवळपास पोहचला आहे.या मतदारसंघात भाजपचे नीरज कुमार सिन्हा, जन सुराजचे प्रशांत किशोर आणि राजदच्या रेखा कुमारी गुप्ता यांच्यासह 25 उमेदवार रिंगणात होते.
बांकीपूर विधानसभा मतदारसंघ हा राजधानी पटनामधील मतदारसंघ आहे. मतदारसंघ रचनेपूर्वी हा मतदारसंघ पटणा पश्चिम म्हणून ओळखला जात होता. 2006 ला नितीन नबीन पहिल्यांदा येथून निवडून आले. मतदारसंघ फेररचनेनंतर 2010 ते 2025 असे सलग चारवेळा येथून निवडून आलेत. गेल्या वर्षी ते तब्बल 52 हजार मतांची आघाडी घेऊन विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) च्या उमेदवार रेखाकुमारी गुप्ता यांचा पराभव केला होता.
या जागेवर तिरंगी लढत होतेय. भाजपकडून नीरजकुमार सिन्हा. जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर आणि आरजेडीच्या रेखाकुमारी गुप्ता अशी तिरंगी लढत होत आहे. गेल्या वर्षी बिहारच्या सर्व विधानसभा मतदारसंघात प्रशांत किशोर यांनी उमेदवार दिले होते. परंतु प्रशांत किशोर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले नव्हते. आता ते स्वत: रिंगणात आहेत. त्यामुळे येथे चुरशीची निवडणूक झाली आहे. भाजपच्या उमेदवारासाठी थेट राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी हे प्रचारात उतरले होते. तर आरजेडीचे प्रमुख तेजस्वी यादव यांनीही आपल्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेत भाजपला घेरले आहे. तर प्रशांत किशोर यांनी थेट दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन, बिहारमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत भाजपला घेरले आहे. मतदानाला जाताना विद्यार्थ्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा, असे आवाहन प्रशांत किशोर यांनी मतदारांना केले आहे. शिक्षणाचा हक्क, बिहारी मुलांना बिहारमध्येच रोजगार मिळावा, हा मुद्दा प्रचारात आणला आहे.
बांकीपूर शहरी मतदार आणि जातीय राजकारण
बांकीपूर हा शहरी मतदार आहे. येथे भाजपला मानणारा मतदार आहे. बांकीपूरमध्ये महाआघाडी म्हणजे आरजेडी-काँग्रेसची ताकद एकदम कमी आहे. गेल्या निवडणुकीत ते दिसून आले आहे. त्यात प्रशांत किशोर यांना स्थानिक मुद्द्यांवर मतदारांनी साथ दिल्यास ते मतदारसंघात करिश्मा करू शकतात. या मतदारसंघ अल्पसंख्याक, यादव मतदार आहेत. परंतु ग्रामीण भागासारखे प्राबल्य नाहीत.
आंदोलनानंतर भाजपसाठी लिटमस टेस्ट
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे लोण सर्वाधिक बिहारमध्ये दिसून आले. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. गोळ्या झाडल्या. त्याचा रोषही तरुणांवर आहे. त्यामुळे याचा परिणाम येथे होऊ शकतो. झेन झीच्या आंदोलनानंतर भाजपसाठी ही लिटमस टेस्ट असून, तेही राष्ट्रीय अध्यक्षांचा बालेकिल्ल्यात. त्यामुळे भाजप पुन्हा हा मतदारसंघ राखून झेन-जी आपल्यावर नाराज नसल्याचे दाखवून देऊ शकतात.
