Bengaluru Local Elections : कर्नाटक राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर होणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. याबाबत बंगळुरुचे मुख्य निवडणूक अधिकारी जी. एस. संगरेशी यांनी सांगतिले की, बेंगळुरु प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच महानगरपालिकांच्या निवडणुका 25 मे नंतर होणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, या निवडणुका 10 वी, 11 वी आणि 12 वीच्या परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आणि 30 जूनपूर्वी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुका देखील बॅलेट पेपरवर होणार असल्याची माहिती संगरेशी यांनी दिली.
बॅलेट पेपरचा (Bengaluru Local Elections) वापर करुन निवडणुका घेण्यावर कोणतेही कायदेशीर बंधन नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील कोणताही आक्षेप घेतलेला नाही. बॅलेट पेपर ही निवडणुकीची एक जुनी आणि स्वीकारलेली पद्धत असून अमेरिकेसारखे विकसित देशही आज बॅलेट पेपरचा वापर करत आहे असं देखील ते म्हणाले. तसेच राज्य निवडणूक आयोग (G. S. Sangareshi) ही एक स्वतंत्र संवैधानिक संस्था आहे आणि हा निर्णय कोणत्याही राजकीय दबावाखाली घेण्यात आला नाही असं देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाच्या निर्णयांमध्ये सरकार हस्तक्षेप करणार नाही : उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार
कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (D. K. Shivakumar) म्हणाले की, राज्य निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे आणि सरकार त्यांच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करणार नाही. भाजप सरकारने लागू केलेल्या बीबीएमपी कायद्यात बॅलेट पेपर पर्याय आधीच अस्तित्वात आहे आणि तो वाढविण्यात आला आहे. बृहत् बेंगळुरू प्राधिकरण अंतर्गत पाच महानगरपालिका तयार करण्यात आल्या आहेत: बेंगळुरू मध्य, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम, जिथे 369 वॉर्डसाठी निवडणुका घेतल्या जातील आणि 8,044 मतदान केंद्रे स्थापन केली जातील.
भाजपचा हल्लाबोल
तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर भाजपकडून देखील प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भाजपने या निर्णयावरुन काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राजीव गांधी यांच्या काळापासून ईव्हीएमने निवडणूक घेण्याची प्रथा सुरु झाली असून आता काँग्रेस पक्ष फक्त राहुल गांधींना खुश करण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणूक घेत असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे.
