नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने (BJP) केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांच्या नेतृत्तात एका ‘आठ सदस्यीय’ समितीची स्थापना केली आहे. निवडणुकीपुरते पक्षात येणाऱ्या आयारामांना चाप बसविण्यासाठी आणि इतर पक्षातील कोणते नेते आपल्या पक्षात येऊ शकतात, पक्षाच्या साच्यात फिट बसू शकतात अशा चेहऱ्यांचा शोध घेण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. (BJP has formed an ‘eight-member’ committee under the leadership of Union Minister Bhupendra Yadav.)
यादव यांच्यासोबतच या समितीमध्ये केंद्रीय मंत्री अश्वनी वैष्णव, केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, तरुण चुघ, सुनील बन्सल आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांचा समावेश आहे. पक्षात घेण्यापूर्वी ही समिती त्या नेत्यांची कसून चौकशी करेल. या समितीकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच अन्य पक्षांच्या नेत्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
येत्या 6 जानेवारी रोजी या समितीची पहिली बैठक होणार आहे. या समितीमुळे हंगामी आयारामांना चाप बसणार असला तरीही इतर पक्षातील नेत्यांचा शोध घेण्याची जबाबदारी या समितीवर असल्याने 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना धक्का बसण्याची आणि त्यांचे मनोधैर्य खच्ची होण्याची शक्यता आहे.
भाजपने यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये अशी रणनीती आखली होती. भाजपने तिथे साकारलेल्या बंपर विजयात या समितीची भूमिका महत्वाची ठरली होती. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठीही या समितीची स्थापना केल्याने विरोधकांची धाकधूक वाढली आहे. काँग्रेस, सपा, बसपा, आरएलडी, जेडीयू आणि इतर विरोधी पक्षांतील प्रभावशाली नेत्यांना पक्षात सामील करून घेण्याची मोहीम भाजप राबविण्याची शक्यता आहे.