भोपाळ : येथील भाजप नेते राजेंद्र पांडे याने पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पत्नीने दारु पिण्यापासून अडवल्याने रागाच्या भरात हे कृत्य केल्याची माहिती आहे. पोलिसांनी संबंधित भाजप नेत्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. (BJP leader Rajendra Pandey shot dead his wife after she stopped him from drinking alcohol)
मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळच्या रतीबाद पोलीस स्टेशन हद्दीतील साईनाथ कॉलनीत आपल्या कुटुंबासह राहतात. ते भाजपशी संबंधित असून ते टीटी नगर मंडळाचे माजी उपाध्यक्षही होते. त्यांच्या पत्नी शीला याही भारतीय जनता महिला मोर्चाच्या सक्रिय सदस्य होत्या. त्यांना दोन मुली असून त्यांचे लग्न झाले आहे.
राजेंद्र पांडे यांना मागील अनेक दिवसांपासून दारूचे व्यसन आहे. त्यावरुन दोघांमध्ये सातत्याने खटके उडायचे. मंगळवारी रात्री त्याने कुटुंबीयांच्या उपस्थितीत घरातच दारू पिण्यास सुरुवात केली. यावरून राजेश पांडेचा पत्नीशी वाद सुरू झाला. मुलगी व जावयाने सुरुवातीला हे प्रकरण शांत केले. मात्र राजेंद्र पांडे रागाच्या भरात घराबाहेर पडला. सुमारे तासाभरानंतर तो घरी परतला. त्यावेळी पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला.
संतापलेल्या राजेंद्रने आपली परवाना असलेली बंदूक उचलली आणि पत्नी शीला हिच्यावर गोळीबार केला. गोळी शीला यांच्या कमरेला लागली आणि ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. पत्नीवर गोळी झाडल्यानंतर राजेंद्र याने घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी शीला यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर शीला यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी आरोपी भाजप नेत्याविरुद्ध पत्नीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.