चंदीगड : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या साथीने कमळ फुलविल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी चंदीगडचीही मोहीम फत्ते केली आहे. बिहारसोबत चंदीगडचेही प्रभारी असणाऱ्या तावडेंनी सलग तिसऱ्या वर्षी बहुमत नसतानाही भाजपचा (BJP) महापौरपदाचा उमेदवार विजयी करुन दाखविला आहे. तावडेंच्या या कामगिरीमुळे भाजपने सगल नवव्या वर्षीही महापौरपद आपल्याकडे राखले आहे. (BJP’s Manoj Sonkar won the election for the post of mayor of Chandigarh Municipal Corporation)
आज (30 जानेवारी) अत्यंत अटीतटीत पार पडलेल्या महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या मनोज सोनकर यांनी दणदणीत विजयी मिळविला आहे. त्यांनी आम आदमी आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार कुलदीप कुमार यांचा चार मतांनी पराभव केला. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने एकत्र येत बहुमताचा आकडा तयार केला होता. मात्र निकालानंतर या दोन्ही पक्षांची आठ मते अपात्र ठरली. त्यामुळे भाजपच्या सोनकर यांचा चार मतांनी विजयी झाला.
35 सदस्यांच्या महापालिकेत बहुमताचा आकडा 19 होता. यात आम आदमी पक्षाचे 13 तर काँग्रेसचे सात नगरसेवक आहेत. मात्र या दोन्ही पक्षांनी एकत्र येत भाजपविरोधात बहुमताचा आकडा तयार केला होता. तर भाजपकडे 15 मते होती. यात 14 नगरसेवकांची आणि एक मत खासदार किरण खेर यांचे होते. याशिवाय शिरोमनी अकाली दलाचे एक नगरसेवक होते. निकालानंतर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला 20 मते मिळाली मात्र आठ मते अवैध ठरली. तर भाजपच्या सोनकर यांना 16 मते मिळाली.
#WATCH | BJP wins Chandigarh mayoral elections with 16 votes to its mayor candidate Manoj Sonkar. The Congress & AAP mayor candidate Kuldeep Singh got 12 votes. 8 votes were declared invalid. pic.twitter.com/vjQYcObylT
— ANI (@ANI) January 30, 2024
पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांची राजधानी असलेल्या चंदीगड शहराला राजकीय दृष्या मोठे महत्व आहे. सहाजिकच इथली महापालिका आणि महापौरपदही अत्यंत महत्वाचे समजले जाते. हेच महत्वाचे महापौरपद भाजपने मागील आठ वर्षांपासून आपल्या ताब्यात ठेवले आहे. तर आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचे बहुमत असल्याने भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जात होती.
यापूर्वी 16 जानेवारी रोजी महापौरपदाची निवडणूक होणार होती. मात्र उपायुक्तांनी आजरपणामुळे आठ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्याचे घोषित केले. त्यावर आम आदमी पक्षाने आणि काँग्रेसने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने 30 जानेवारीला निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज महापालिका सभागृहात सकाळी 11 वाजता मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर लगेचच मतमोजणीही झाली.