Building collapses in Delhi 6 dead, 8 critically injured case registered against building owner : राजधानी दिल्लीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी आहेत, ढिगाऱ्याखाली अजूनही 15 ते 20 जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. या दुर्घटनेत विद्यार्थी आणि कामगारांसह 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी इमारतीचे मालक हरिराम बन्सल आणि इतरांविरोधात साऊथ कॅम्पस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतकंच वाटतंय तर देशात राहायला या; मोदींचं कौतुक करणाऱ्या NRI महिलेची मिमिक्री करत राज ठाकरेंचा टोला
माहितीनुसार, सुमारे 40 ते 50 वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीत पेईंग गेस्ट (PG) हॉस्टेल चालवले जात होते. रविवारी दुपारी दुर्घटना घडली, त्यावेळी इमारतीच्या तळघरात दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र इतक्या जुन्या इमारतीत विद्यार्थ्यांचे पीजी सुरू करण्यास परवानगी कशी देण्यात आली आणि ती भाड्याने देण्यासाठी योग्य असल्याची खात्री करण्यात आली होती का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
दुर्घटना की निष्काळजीपणाचा परिणाम?
ही घटना केवळ अपघात नसून निष्काळजीपणा आणि नियमांकडे झालेल्या दुर्लक्षाचा परिणाम असल्याची चर्चा सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, मूळ इमारतीत तीन मजल्यांना परवानगी असताना तिचे बांधकाम पाच मजल्यांपर्यंत वाढवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे या अतिरिक्त बांधकामाला अधिकृत मंजुरी होती का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.इमारतीचा बांधकाम नकाशा मंजूर होता का? पाच मजल्यांच्या बांधकामासाठी परवानगी नसल्यास संबंधित प्रशासनाने वेळीच कारवाई का केली नाही? जुन्या इमारतीत विद्यार्थी वास्तव्यास असताना तळघरात दुरुस्ती किंवा बांधकाम करण्याची परवानगी कशी देण्यात आली? असे गंभीर प्रश्न या दुर्घटनेनंतर समोर आले आहेत.
पाण्याने भरलेल्या बेसमेंटमध्ये सुरू होते काम
मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या तळघरात पाणी साचलेले असतानाही तेथे काम सुरू होते. दुर्घटना घडली तेव्हा अनेक विद्यार्थी आपल्या खोल्यांमध्ये उपस्थित होते. त्यामुळे इमारतीच्या सुरक्षिततेची तपासणी वेळोवेळी करण्यात आली होती का आणि या मृत्यूंना नेमके कोण जबाबदार आहे, याबाबत आता चौकशीची मागणी होत आहे. दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसजवळील सत्य निकेतन हा विद्यार्थ्यांचा प्रमुख परिसर म्हणून ओळखला जातो. येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी पीजी आणि खासगी हॉस्टेलमध्ये राहतात. त्यामुळे या भागात दिवसभर विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते.
बेकायदा बांधकामांवर कारवाईची मागणी
दिल्लीमध्ये अस्तित्वात असलेल्या इमारतीत बेसमेंट तयार करायचे असल्यास संबंधित प्राधिकरणाकडून सुधारित बांधकाम आराखड्याला मंजुरी घेणे आवश्यक असते. मात्र या दुर्घटनेनंतर राजधानीतील जुन्या आणि संभाव्य धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर जुन्या इमारती असून, त्यापैकी अनेक इमारतींच्या बांधकामाची आणि सुरक्षिततेची तपासणी करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. बेकायदा बांधकामांवर कठोर कारवाई आणि जुन्या इमारतींचे नियमित सुरक्षा ऑडिट केले नाही, तर अशा दुर्घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
