Download App

आता टोल नाक्यावरील कर्मचारीही म्हणणार ‘प्लीज’ अन् ‘थँक यू’, वाद टाळण्यासाठी NHAI चा खास निर्णय

टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. जेणेकरून ही मंडळी वाहनचालकांशी विनम्रतेने संवाद साधतील. 

Toll Plaza News : एक्सप्रेस वे आणि महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना टोल नाक्यावर काही वेळ थांबावेच लागतं. याच वेळात टोलनाक्यावरील कर्मचारी त्यांच्याशी कसं वागतात हे वेगळं सांगायला नको. कारण बहुतांश वाहनचालक कर्मचाऱ्यांच्या आडमुठ्या स्वभावाची तक्रार करतच असतात. वाहनचालकांशी अरेरावी करत बोलणं तर अगदी कॉमन झालं आहे. पण आता हे सगळे प्रकार थांबणार आहेत. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) या प्रकारांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. जेणेकरून ही मंडळी वाहनचालकांशी विनम्रतेने संवाद साधतील.

टोलनाक्यांवर तक्रारींचा पाऊस

रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात जवळपास दीड लाख किलोमीटर लांबीचा नॅशनल हायवे आणि एक्सप्रेस वे चे जाळे आहे. यातील 45 हजार किलोमीटरवर टोलची वसुली केली जाते. टोल वसूल करण्यासाठी या रस्त्यांवर तब्बल 1063 टोल नाके तयार केले आहेत. यातील काही स्टेट हायवेवरील टोल प्लाजा या नेटवर्कच्या बाहेर आहेत. यातील 700 टोलनाके एनएचएआयच्या अखत्यारित आहेत. उर्वरित टोलनाके बीओटी तत्वावर चालवले जातात.

मंत्रालयाचे म्हणणे आहे की टोलनाक्यांवरील कर्मचाऱ्याच्या वर्तणुकीबाबतीत तक्रारी सतत येत असतात. यातील बहुतांश तक्रारी या टोल देण्यास इच्छुक नसणाऱ्या वाहनचालकांच्या असतात. यामुळे संबंधित वाहनचालक आणि कर्मचाऱ्यांत वाद होतात. अशा प्रकारचे वाद रोखण्यासाठीच एनएचएआयने टोल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या प्रशिक्षणाला सुरुवातही झाली आहे.

वाहनधारकांसाठी मोठी बातमी! टोलचं झंझट कायमचं मिटणार, सरकार ‘या’ योजना आणण्याच्या तयारीत

अशी असेल ट्रेनिंग

मंत्रालयानुसार कर्मचाऱ्यांना एनएचएआयचे अधिकारी आणि काउंन्सलर, मनोवैज्ञानिक प्रशिक्षण देणार आहेत. वाहनचालकांकडून टोल घेतेवेळी कशा प्रकारची वागणूक असावी हावभाव कसे असावेत याचे खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. उदा. ज्यावेळी एखादी गाडी टोलवर येईल त्यावेळी कर्मचाऱ्याने वाहनचालकाच्या डोळ्यात डोळे घालून बोललं पाहिजे. वाहनचालकाला कोणत्या गोष्टींचा राग येऊ शकतो हे देखील कर्मचाऱ्यांना सांगण्यात येणार आहे.

वेगवेगळ्या वाहनचालकांशी वेगवेगळ्या प्रकारे बोलण्याची पद्धत शिकवली जाणार आहे. ट्रकचालकाशी ज्या प्रकारे संवाद साधला तेच शब्द कारचालकाशी बोलताना वापरता येणार नाहीत. कारण या दोन्ही वाहनचालकांचा मानसिक स्तर वेगवेगळा असतो. अशा प्रकारे टोल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. दरम्यान, देशातील 1063 टोलनाक्यांपैकी 14 टोलनाक्यांवर सर्वाधिक कमाई होते. मंत्रालयाच्या माहितीनुसार या टोलनाक्यांवर वार्षिक 200 कोटींपर्यंत कमाई होते. हे टोलनाके वेगवेगळ्या राज्यांत आहेत.

ब्रेकिंग : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर टरकलेल्या पाकिस्तानने BSF जवानाला 20 दिवसांनी सुखरूप सोडलं

follow us