पोटनिवडणुकांचा बिगुल वाजला; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांचा बालेकिल्ला भेदण्यासाठी ‘दीदी’ पुन्हा मैदानात उतरणार?

दोन मतदारसंघांत विजय मिळवल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्रामची जागा रिक्त केली आहे.

News Photo   2026 09 07T203055.938

पोटनिवडणुकांचा बिगुल वाजला; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांचा बालेकिल्ला भेदण्यासाठी ‘दीदी’ पुन्हा मैदानात उतरणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Byelection) पश्चिम बंगालमधील नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा केल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्रामची जागा सोडल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी पुन्हा या मतदारसंघातून निवडणूक लढवणार का, हा सर्वात मोठा प्रश्न ठरला आहे.

नंदीग्राम हा सुवेंदू अधिकारी यांचा मजबूत गड मानला जातो. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्रामसह भवानीपूरमधून विजय मिळवला.

दोन मतदारसंघांत विजय मिळवल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्रामची जागा रिक्त केली आहे. त्यामुळे आता होणाऱ्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी पुन्हा एकदा या मतदारसंघात उतरल्या, तर 2021 च्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. त्यामुळे नंदीग्राममध्ये भाजप विरुद्ध तृणमूल असा पुन्हा हायव्होल्टेज सामना रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नंदीग्रामसह आसाममधील नागांव लोकसभा आणि अन्य 4 विधानसभा मतदारसंघांसाठी 6 ऑक्टोबरला मतदान होणार असून 9 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. मात्र, या पोटनिवडणुकांमध्ये सर्वाधिक उत्सुकता नंदीग्रामच्या निकालाची असून ममता बॅनर्जी पुन्हा मैदानात उतरतात का, याकडे पश्चिम बंगालसह देशाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version